मुंबई : राज्यात मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यानं विविध राजकीय पक्षांकडून रविवारी म्हणजेच 28 सप्टेंबर 2025 ला होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आता 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर, 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवरील 524 उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. तथापि, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्र क्रमांक मलोआ-११२५/प्र.क्र.२३६/मलोआ, दिनांक 26 सप्टेंबर, 2025 अन्वये केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025, दिनांक 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येईल.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक 09 नोव्हेंबर, 2025 रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा सुधारित दिनांक शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
Post a Comment