नगर जिल्ह्यातील 'ही' जिल्हा परिषद शाळा राबवणार 'डिजिटल लॉकडाऊन' ची संकल्पना



पाथर्डी - डिजिटल युगाचे दुष्परिणाम नव्या पिढीवर पडून शालेय मुलांच्या मानसिक व बौद्धिक क्षमतेवर वाईट परिणाम होऊ नयेत, पालक-बालक संवाद कुटुंबामध्ये अधिक वाढावा यासाठी प्रायोगिक स्वरूपात पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने "डिजिटल लॉकडाऊन' अशी संकल्पना ग्रामस्थांपुढे पुढे मांडत त्याची अंमलबजावणी समारंभपूर्वक सुरू केली. या संकल्पनेनुसार मुलांना मोबाइलपासून दूर ठेवत त्यांना मैदानी खेळाकडे आकर्षित करणो व अभ्यासामध्ये गोडी निर्माण करण्यासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. असा उपक्रम राबविणारी सोनोशीती शाळा जिल्ह्यातील एकमेव असल्याचा दावा करण्यात आला.

शिक्षण विभागाचे शालेय पोषण आहार अधीक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड यांच्या हस्ते उपक्रमाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. ते म्हणाले की, डिजिटल युगामध्ये टीव्ही, मोबाइल व अन्य समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे सर्वांचेच अतिशय नुकसान होत आहे. या उपक्रमांच्या सतत सानिध्यात असणाऱ्या लोकांना स्मृतीभ्रंश, विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. बौद्धिक व वैचारिक विकास मंदावतो. घरातील सर्व जणांना मोबाईलचे व्यसन जडल्याने कुटुंबातील संवाद हरपला आहे. हास्यविनोद मैदानावरचे खेळ, गप्पाष्टके, परस्परांच्या सुख दुःखात धावून जाणे, गरजूंना मदत करणे अशा भावना कमी कमी होत जाऊन शाळकरी मुले आत्मकेंद्री व चिडखोर बनली आहेत. 

सोनोशी गावातील जिल्हा परिषद शाळेने पालकांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या समन्वयातून आगळावेगळा डिजिटल लॉकडाऊन असा उपक्रम अमलात आणला. मुलांना मोबाइलपासून दूर ठेवणे, मैदानी खेळाकडे आकर्षण वाढवत अभ्यासामध्ये गोडी निर्माण करणे, असे मूळ उद्देश या उपक्रमाचे आहेत. शाळेतील शिक्षक अमोल भंडारी, अण्णासाहेब साळुंखे, बाबासाहेब खेडकर, नारायण दहिफळे, दत्तात्रय दहिफळे, रामदास चौधरी आदींचा मोलाचा वाटा आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी सेवा संस्थेचे पदाधिकारी सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांनी योगदान देण्याचे मान्य केले. बाबासाहेब खेडकर यांनी प्रास्ताविक केले. अण्णासाहेब साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.

मुलांच्या अभ्यासाकडे पालकांनी द्यावे लक्ष पहिली ते बारावीत शिकणाऱ्या सर्व मुलांना व त्यांच्या पालकांना या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. या अंतर्गत सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ज्यांची मुले शाळेत शिकत आहेत, अशा पालकांनी घरातील मोबाइल, टीव्ही बंद ठेवून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कुटुंबातील अन्य सदस्यांनी मुलांबरोबर मनमोकळ्या गप्पा माराव्यात. हास्य विनोद, करून सर्वांनी एकत्रित बसावे. परस्पर संवादातून सकारात्मक विचारसरणी वाढवत कुटुंबाला म्हणजे पर्यायाने दैनंदिन जगण्याला नवी दिशा मिळावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे मुलांना सुद्धा घरामध्ये अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळून आई-वडील मुलांचा सहजपणे अभ्यास घेऊ शकतील.

0/Post a Comment/Comments