नाशिक - राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता, मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी १८ जिल्ह्यांमध्ये मंगळवार (दि.३०) पासून पावसाचा जोर कमी होऊन तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण आणि विदर्भात दसऱ्यानंतरही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्रावरून पाऊस पाडणारे कमी दाबाचे क्षेत्र सध्या सौराष्ट्रात पोहोचले आहे. पुढील २४ तासांत हे क्षेत्र अरबी समुद्रात उतरून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होऊन ओमानच्या दिशेने मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात उघडीपीची शक्यता निर्माण झाली आहे.
परतीचा मान्सून स्थिर
देशात परतीच्या मार्गावर असलेला मान्सून ३ ऑक्टोबरपर्यंत वेरावळ, भरूच, उज्जैन, झाशी, शहाजहाणपूर या शहरांदरम्यानच्या सीमारेषेवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांत मान्सूनच्या माघारीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. पावसाचा जोर कमी होण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांची काढणी, कांदा बियाणे टाकणी, द्राक्ष बागांची छाटणी, वाफसा भाजीपाला काढणी, हरबरा-ज्वारी पेरणी आणि रब्बी पिकांसाठी जमीन तयार करण्यास चालना मिळेल. तथापि, शेतकऱ्यांनी हवामान विभागाचा (Meteorological Department) अंदाज तपासूनच निर्णय घ्यावेत, असे आवाहन खुळे यांनी केले आहे.
Post a Comment