बापरे... जमीन विक्री व्यवहारात डीएसपी ऑफिस मध्ये कार्यरत पोलिसालाच गंडवले


पारनेर - महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा शासनाकडून मोबदला घेतला, परंतु केवळ या संपादित जमिनीचे महसूल विभागातून निघणारे कमी जास्त पत्रक न निघाल्याने ७ /१२ उताऱ्यावरून सदर क्षेत्र कमी न झाल्याचा गैरफायदा घेत सदर क्षेत्र विक्री करून जिल्हा पोलिस दलात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेल्या पोलिसाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांच्या विरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रभाकर भाऊसाहेब भांबरकर (वय ५५, रा. राणी लक्ष्मीबाई चौक, केडगाव, मूळ रा. भाळवणी ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना मुलांच्या व्यवसायासाठी कृषक व अकृषक शेतजमीन खरेदी करायची होती. त्यामुळे ते शोध घेत असताना त्यांना काही ओळखीच्या व्यक्तींकडून भाळवणी येथील लताबाई बाळासाहेब रोहकले यांची महामार्गालगत ११३.५ गुंठे शेतजमीन विक्री साठी असल्याचे समजले. त्यांनी भाळवणी येथे जावून रोहकले यांच्याशी चर्चा केली. त्यांचा व्यवहारही ठरला. त्यानुसार त्यांनी त्यांच्या व पत्नीच्या नावे १७ जानेवारी २०२५ रोजी पारनेर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात साठेखत व ८ मे २०२५ रोजी खरेदीखत करून जमीनीचा व्यवहार पूर्ण करत ठरलेली रक्कम रोहकले यांना दिली.

त्यानंतर सध्या नगर - कल्याण महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने आपण खरेदी केलेल्या जमिनीचे काही क्षेत्र या साठी संपादित होणार आहे किंवा कसे याची त्यांनी चौकशी केली. प्रांताधिकारी कार्यालयात चौकशीसाठी गेल्यावर त्यांना समजले की त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या शेतजमिनी पैकी ७ गुंठे जमीन ही सन २०२२ मध्येच या महामार्गाच्या कामासाठी शासनाने संपादित केलेली असून त्याचा मोबदला म्हणून ८ लाख ३ हजार ७७९ रुपये एवढी रक्कम आरटीजीएस द्वारे शासनाने पूर्वीच्या जमीन मालक लताबाई बाळासाहेब रोहकले यांच्या बँक खात्यात ८ डिसेंबर २०२२ रोजी जमा करण्यात आलेली आहे.

या संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला घेवून केवळ या संपादित जमिनीचे महसूल विभागातून निघणारे कमी जास्त पत्रक न निघाल्याने ७ /१२ उताऱ्यावरून सदर क्षेत्र कमी न झाल्याचा गैरफायदा घेत सदर क्षेत्र चालू बाजारभावाच्या किंमतीत खरेदीखताद्वारे आपणास विक्री करून आपली तसेच  भारतीय नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८२ चे उल्लंघन करून शासनाची जमीन मालक लताबाई बाळासाहेब रोहकले, त्यांचे पती बाळासाहेब रामदास रोहकले व मुलगा विजय बाळासाहेब रोहकले (सर्व रा. भाळवणी ता. पारनेर) यांनी फसवणूक केली आहे. या तिघांवर या पूर्वी ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्या पासून आपणास व आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचे प्रभाकर भांबरकर यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२, बीएनएस कलम ३(५), ३१६ (२), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ हे करत आहेत.       

0/Post a Comment/Comments