केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ५ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर



अहिल्यानगर - केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत असून, सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे अर्ध्वयू माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

यासंदर्भात माहिती देताना डॉ.विखे पाटील म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे सहकाराच्या भूमीत लोणी येथे दुसऱ्यांदा येत असून, यापूर्वी सहकार मंत्रालयाची धूरा त्यांच्याकडे आल्यानंतर राज्यातील पहिल्या सहकार परिषदेसाठी त्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. लोणी येथील विविध कार्यक्रमांना त्यांना पुन्हा निमंत्रीत करण्यात आले असून, प्रवरा परिवाराची विनंती मान्य करुन त्यांनी दोन्ही कार्यक्रमांना येण्याचे मान्य केले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ  पर्यावरण तथा पशुसंवर्धन विकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य मंत्री तसेच महायुतीचे लोक प्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.

प्रवरानगर येथे दुपारी १२ वाजता अमित शहा यांचे आगमन होणार असून, कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. त्यानंतर सर्व मान्यवर लोणी गावात येवून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील. गावातीलच बाजारतळावर दुपारी १ वाजता सर्व मान्यवरांचे सभास्थळी आगमन होणार असून, या सभेस केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर मार्गदर्शन करतील. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या स्वागताची जय्यत तयारी प्रवरा परिवाराच्या वतीने सुरु करण्यात आली असून, लोणी गावातील बाजारतळावर भव्य सभामंडपही उभारण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments