आ. गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर पुन्हा विखारी टीका:जयंत्या म्हणत एकेरी उल्लेख



जत - जतमध्ये आयोजित दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच समज दिल्यानंतरही पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवले आहे. तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? असा सवाल करत त्यांनी जयंत पाटलांना थेट आव्हान दिलं. जातीवंत पाटील असाल तर वेळ, तारीख आणि ठिकाण सांगा, मी तिथे हजर राहतो, असेही पडळकर म्हणाले.

या भाषणात पडळकरांनी आक्षेपार्ह भाषा वापरत जयंत पाटलांसोबतच त्यांच्या निकटवर्तीय दिलीप पाटील यांच्यावरही टीका केली. त्यांनी दिलीप पाटील यांचा वाळव्याचा कुत्रा असा उल्लेख केला. या विधानामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात तीव्र संतापाची लाट उसळली असून, पडळकरांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध होण्याची शक्यता आहे.

अनेक कुत्र्यांना तुडवत इथंपर्यंत आलोय

गोपीचंद पडळकर म्हणाले, मी फकीर माणूस आहे. मला कुणाची भीती नाही. अनेक गावठी कुत्र्यांना तुडवत तुडवत मी आज इथंपर्यंत आलोय. मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण मी घाबरणार नाही. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातील आहे. मी मंगळसूत्र चोर नाही, पण जयंतराव, तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं, हे तरी सांगा.

आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम

आपल्या भाषणात पडळकरांनी आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठा आणि ओबीसींना एकमेकांविरोधात उभं केलं जात आहे. माझी भूमिका पूर्वी होती तीच आज आहे आणि उद्याही राहील. जेव्हा देवेंद्र फडणवीसांचा विषय असेल तेव्हा मी बाजीप्रभूप्रमाणे त्यांच्या मागे उभा राहीन, असे त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधकांकडून निषेधाची तयारी

पडळकरांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आधीच पडळकरांच्या वक्तव्याविरोधात रस्त्यावर उतरले होते. आता या नव्या विधानानंतर निषेध अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत. जयंत पाटील यांनी मात्र यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, भाजपच्या गोटातही पडळकरांच्या वक्तव्यामुळे अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

0/Post a Comment/Comments