'या' कारणाने एसटी ची १० टक्के हंगामी भाडेवाढ अखेर रद्द: परिवहन मंत्र्यांची घोषणा
मुंबई - राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी (दि.१) एसटीची 10 टक्के भाडेवाढ रद्द करण्याची घोषणा केली. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटीने ऐन सणावारांच्या दिवसांत 10 टक्के भाडेवाढ निर्णय घेतला होता. अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य नागरीक हवालदिल झाला असताना ही दरवाढ झाल्यामुळे तिचे तीव्र पडसाद उमटले होते. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईकांना ही भाडेवाढ मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सरनाईकांनी लगेचच ही भाडेवाढ मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य परिवहन महामंडळाने मंगळवारी दिवाळीच्या काळात म्हणजे 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीसाठी 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ही भाडेवाढ सरसकट सर्वच बसेसना लागू नव्हती. त्यातून वातानुकूलित शिवनेरी व शिवाई बसेस वगळण्यात आल्या होत्या. यामुळे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या लालपरीसह लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनुकूल असणाऱ्या रातराणीच्या सर्वच प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार होता. त्यामुळे ही दरवाढ मागे घेतली जावी अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही हंगामी दरवाढ मागे घेण्याची घोषणा केली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार दरवाढ मागे
एसटीच्या दरवाढीवर सामान्य जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना ही दरवाढ मागे घेण्याची सूचना केली. त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी वेळ न दवडता लगेचच ही दरवाढ मागे घेण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा अतिवृष्टीने मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांसह दिवाळीला गावी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना फायदा होणार आहे.
चालू वर्षाच्या सुरुवातीला झाली होती दरवाढ
उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी टॅक्सी व रिक्षा चालक संघटनांकडून भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागला होता. 24 जानेवारी 2025 पासून एसटीची भाडेवाढ लागू करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) बैठकीत 14.95 टक्के तिकीट दरवाढीला मान्यता दिली होती. तशी औपचारिक घोषणाही करण्यात आली होती.
सणावारांच्या दिवसांत प्रवाशांच्या खिशावर नजर
दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाची अग्निपरीक्षा असते. कारण, या काळात राज्यभरातील चाकरमानी आपापल्या गावी जातात. सुट्ट्या असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. एसटीला चांगला महसूल मिळतो. त्यामुळे सणावाराच्या दिवसांत प्रवाशांचा वाढणारा ओघ व त्यातून मिळणारा महसूल लक्षात घेता एसटीतर्फे दरवर्षी दिवाळीच्या काळात काही टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो.
Post a Comment