श्रीरामपूर - अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी एक मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत आली आहे. भगवानबाबा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेत ४९ ठेवीदारांच्या ५ कोटी ६३ लाख ४९ हजार ७६४ रुपयांच्या ठेवी अडकल्या असून या ठेवींची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने संस्थेच्या संचालक मंडळावर २६ नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ठेवीदार सौ.निकिता सचिन पवार (रा.केसापूर, ता.राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. भगवान बाबा मल्टिस्टेटच्या नगर शहरासह शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी, बोधेगाव येथे शाखा आहेत. श्रीरामपूर शाखेत फिर्यादी यांच्या पतीच्या नावे सन २०२३ मध्ये २ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. या ठेवींची मुदत संपल्यावर आणि फिर्यादी यांच्या कुटुंबियांना पैशांची आवश्यकता असल्याने त्या संस्थेत ठेवी आणि त्यावरील व्याजाची रक्कम मागण्यास गेल्या असता ठेवी परत करण्यास टाळाटाळ सुरु करण्यात आली.
त्यांनी संस्थेच्या चेअरमनसह संचालक मंडळाशी अनेकवेळा संपर्क साधून ठेवीच्या रकमेची मागणी केली. मात्र त्यांनी ही उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. संस्थेकडून ठेवीची रक्कम तसेच व्याज मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता या शाखेत अजून इतर ४८ ठेवीदारांच्या २ कोटी ६३ लाख ९४ हजार ७६४ रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. अशा फिर्यादी सह ४९ ठेवीदारांच्या ५ कोटी ६३ लाख ४९ हजार ७६४ रुपयांच्या ठेवी देण्यास संचालक मंडळाने टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी ठेवीदारांचे अर्ज, ठेवीच्या पावत्या व इतर कागदपत्रांची चौकशी केल्यावर सौ.निकिता पवार यांची फिर्याद घेत गुन्हा दाखल केला.
यामध्ये संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, संचालक मयूर रंगनाथ वैद्य, नितीन सोपानराव तुपे, शांतीसिंग नागनाथ साखरे, राम लक्ष्मण पोपळघट, किशोर अनिल सुरवसे, वैशाली मयूर सुरवसे, व्यवस्थापक प्रवीण म्हसे या ८ जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. शिखरे हे करत आहेत.

Post a Comment