नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याकडून द्राक्ष घेवून जात त्याचे पैसे न देता ७ लाख २६ हजार, ३६२ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नागपूर येथील फळ व्यापाऱ्यावर २६ नोव्हेंबर रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फकिरा बाबुराव पवार (वय ५४, रा. चिचोंडी पाटील, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या शेतात द्राक्षांची बाग लावलेली आहे. या बागेत उत्पादित झालेल्या द्राक्षांच्या विक्री व्यवहारातून त्यांची नागपूर येथील फळे व्यापारी मोहम्मद अकिल मोहम्मद शमसु रेयान याच्याशी ओळख झाली होती. त्याने फिर्यादी कडून वेळोवेळी द्राक्ष खरेदी करत त्याचे पैसे त्यांना देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर डिसेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत त्याने फिर्यादी यांच्या द्राक्ष बागेतून ७ लाख २६ हजार, ३६२ रुपयांचे द्राक्ष वेळोवेळी खरेदी केले.
थोड्याच दिवसांत पैसे देतो असे त्याने फिर्यादीला सांगितले. त्यानंतर अनेक दिवस झाले तरी त्याने पैसे न दिल्याने फिर्यादीने त्याच्या कडे पैशांसाठी तगादा लावला. त्यावेळी त्याने बँकेचे चेक दिले. ते फिर्यादी यांनी बँकेत भरले असता आरोपीच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने ते चेक न वटता परत आले. त्यानंतर त्याने पुन्हा चेक दिले पण ते ही वटले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही आरोपीने पैसे दिले नाहीत.
त्यामुळे त्याने आपला विश्वास संपादन करून द्राक्ष नेले पण त्याचे पैसे न देता आपली फसवणूक केल्याची फिर्याद पवार यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद अकिल विरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment