अहिल्यानगर - नगर शहराजवळ तपोवन रोडवर असलेल्या कराळे मळ्यात बिबट्याची तीन पिल्ले सापडलेली घटना ताजी असताना २७ नोव्हेंबर रोजी पहाटे एका बिबट्याने बोल्हेगाव परिसरात मेंढपाळाच्या कळपावर हल्ला करत एक मेंढी ठार मारली. तसेच एका बोकडाचा फडशा पाडला आहे.
बोल्हेगाव परिसरात संपत विठ्ठल वाकळे यांच्या शेतात बंडू किसन तांबे (रा.ढवळपुरी, ता.पारनेर) हा मेंढपाळ त्यांचा मेंढ्यांचा कळप घेऊन आलेला होता. पहाटे ४ च्या सुारास या कळपावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात एका मेंढीच्या गळ्याला चावा घेतल्याने तिचा जागेवर मृत्यू झाला तर कळपातील एक बोकड बिबट्याने फरपटत नेले. मेंढपाळाच्या समोरच ही घटना घडली. सकाळी या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना समजली. त्यानंतर काहींनी वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली.
ही माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन गायकवाड व वनरक्षक विजय चेटे यांनी घटनास्थळी जावून मयत मेंढीचा पंचनामा केला. हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे त्यांनी सांगत परिसरातील नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहर परिसरात गेल्या ३-४ दिवसातील बिबट्याच्या वावराची ही दुसरी घटना आहे.
तपोवन रोडवरील कराळे मळ्यात २५ नोव्हेंबर ला दुपारी बिबट्याची तीन पिले आढळली होती. तसेच मादी बिबट्याही आढळून आला होता. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला मात्र बिबट्याने रात्रभर पिंजर्याभोवती घिरट्या घालून हुलकावणी दिली होती. त्यानंतर आता बोल्हेगाव परिसरात बिबट्याने एका मेंढीवर व बोकडावर हल्ला केल्याने शहर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याचे समोर आहे आहे.

Post a Comment