महावितरणने शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा- अभिलाष घिगेंच्या मागणीवर अभियंता म्हणाले...



नगर - नगर तालूक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झालेला असून सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेती पंपांना महावितरणने दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत २ दिवसांत कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन अभियंता सपकाळे यांनी दिले आहे.

नगर तालुक्यात गावागावात बिबट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. हे बिबटे मानवांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला असून त्यांच्या सर्व आशा रब्बी हंगामावर असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. नगर तालुक्यातील वाळकी, गुंडेगांव, देऊळगाव, सारोळा कासार, घोसपुरी, अकोळनेर, बाबुर्डी घुमट, खड़की, हिवरे झरे बाबुर्डी बेंद परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर वाढला असल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. तसेच यावर्षी थंडीचे प्रमाणही वाढलेले आहे. 

या पार्श्वभूमीवर महावितरण ने शेती पंपासाठी थ्री फेज वीज पुरवठा रात्री ऐवजी दिवसा करावा यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळे यांची बुधवारी (दि.१९) बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे,  भाऊसाहेब बहिरट, सुनिल म्हस्के, संतोष धावड़े आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत अभियंता सपकाळे यांनी याबाबत २ दिवसांत कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले असल्याचे अभिलाष घिगे यांनी सांगितले. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरु झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments