सुपा - वाळवणे रस्त्यावर भीषण अपघात, ढंपरखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू



पारनेर  -पारनेर तालुक्यातील सुपा ते वाळवणे रस्त्यावर असलेल्या रूईफाटा येथे मंगळवारी (दि.१८ नोव्हेंबर) सकाळी १० च्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या ढंपरखाली चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाळासाहेब मारुती भिंगारदिवे (वय ६०, हल्ली रा. वाळवणे, ता. पारनेर, मूळ रा. ताठे मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर) यांचा असे मयताचे नाव आहे. 

भिंगारदिवे हे रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ढंपरची धडक बसून ते मागच्या चाकाखाली आले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. दरम्यान, रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत आणि मोठ्या प्रमाणात खोल खड्डे खोदले गेले, यामुळेच हा अपघात घडल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी या घटनेनंतर रस्त्यावरील कामाच्या वेळी ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव आणि धोकादायक खड्ड्यांमुळे परिसरात मोठा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्याचे काम वेगाने सुरू असले तरी, ठेकेदाराने रूईछत्रपती फाटा येथे वळताना धोकादायक खोल दरी ठेवली, जी या अपघातास कारणीभूत ठरली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी मयत बाळासाहेब यांचा मुलगा सुदाम भिंगारदिवे (रा. बालिकाश्रम रोड,अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सुपा पोलिसांनी ढंपरचालक नवाज तय्यब शेख (रा. वाघुंडे, ता. पारनेर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

0/Post a Comment/Comments