पारनेर - पारनेर शहरासह परिसरात गत काही दिवसांपासून वाढलेल्या बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी उशिरा रात्री पारनेर–डिकसळ रस्त्यालगत असलेल्या सोपान बुगे यांच्या शेतातील मेंढपाळ लक्ष्मण करे यांच्या कळपावर दोन बिबट्यांनी अचानक हल्ला चढवत चार शेळ्यांचा फडशा पाडला.
रात्रीचा थरार, कळपावर झडप
पारनेरातील घटनास्थळाजवळील मेंढपाळांच्या मते, एका
बिबट्याने कळपाला गाठताच दुसऱ्यानेही झडप घालत काही क्षणात चार शेळ्यांना ठार
केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी घाबरून घराबाहेर पडण्यासही कचरू
लागले आहेत.
घटना कळताच शुक्रवारी सकाळी पारनेर नगरपंचायतच्या पाणीपुरवठा सभापती योगेश
मते, डॉ.
बाळासाहेब कावरे, सुभाष शिंदे, सोपान
बुगे तसेच वनाधिकारी शेख घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने पंचनामा करून
परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक जनप्रतिनिधींनी तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा
बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पारनेर व परिसरात गेल्या काही महिन्यांत
बिबट्यांच्या वावरात वाढ झाली आहे. ग्रामस्थांच्या मते, रात्रीच्या
वेळी रस्त्यालगत या प्राण्यांची हालचाल दिसत असून जीवितहानीची शक्यता दिवसेंदिवस
वाढत आहे.
दिवसा आणि रात्रीही बिबट्यांचा उच्छाद
निघोज परिसरात लाळगे मळा, चारी रोड, मोरवाडी, रसाळवाडी, रामवाडी, शिववाडी, लामखडे
वस्ती, बोदगेवाडी, पांढरकरवाडी, ढवणवाडी, गाडीलगाव, वडगांव
गुंड, पठारवाडी
या सर्व ठिकाणी बिबट्यांचे खुले दर्शन होत असल्याच्या घटना वनविभागाकडे
नोंदविण्यात आल्या आहेत. शेतकरी सांगतात, रात्री बाहेर पडणे आम्ही
बंदच केले आहे. पण दिवसा शेतात गेले तरी बिबट्या उसामागून किंवा बांधावरून बाहेर
येतो. बिबट्याचा याची देही याची डोळा हा अनुभव अतिशय भयंकर आहे. काही महिलांनी
पाणी भरत असताना १०-१५ फुटांवरून बिबट्या गेल्याचा अनुभव कथन केला. या घटनांमुळे
वाडी-वस्त्यांवरील जीवन भयप्रद झाले आहे.

Post a Comment