कर्जास कंटाळून नगर तालुक्यात युवा शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या



नगर तालुका (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील गोरख रखमाजी खेमनर (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने कर्जाच्या ताणतणावाखाली येऊन ३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता विष घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. 

अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या ३ एकर शेतातील सोयाबीन, कपाशी इत्यादी पिके भुईसपाट झाली होती. शेतातून उत्पन्नाचा मार्ग बंद झाला, त्यानंतर त्यांना मानसिक त्रास सुरू झाला. शेतकऱ्यांना शासनाची मदत वेळेत न मिळाल्याने त्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडाला. 

मागील काळात वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्यावर जवळपास १० लाखाचे कर्ज झाले होते, तसेच इतर कर्ज असे जवळपास त्यांच्यावर २० लाख रुपये कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वाजता विष घेतले. त्यांनी विष घेतले आहे असे घरच्या व्यक्तींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार सुरु असताना ४ नोव्हेंबर रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. शिंगवे नाईक या गावी सर्व गावकऱ्यांच्या उपस्थित दुःखत वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाकडून त्यांना कुटुंबियांना तातडीची मदत मिळावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली. मयत गोरख खेमनर यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments