दोन कुटुंबास मारहाण करुन साडी व धोतराने बांधून ठेवले आणि दागिने, रोकड चोरट्यांनी पळविली




शेवगाव - चोरट्यांनी दोन वस्त्यांवर पती-पत्नीला दोरखंडाने बांधून, लोखंडी रॉड व लाथाबुक्याने मारहाण करत चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही चोरी देवटाकळी (ता. शेवगाव) येथे मंगळवारी (दि. २५) रात्री मगर वस्तीवर झाली. याप्रकरणी हरिभाऊ बाजीराव ओंबळे (रा. देवटाकळी ता. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवटाकळी ता. शेवगाव येथील मगरवस्तीवर हरिभाऊ ओंबळे हे कुटुंबासह राहतात. तसेच शेजारी कल्याण आंधळे, संजय खरड यांच्या वस्त्या आहेत. मंगळवारी ओंबळे हे रात्री जेवण करून कुटुंबासह झोपी गेले होते. त्याच रात्री ११ ते १२ च्या दरम्यान चार अनोळखी चोरट्यांनी घरात घुसून हरिभाऊ ओंबळे व पत्नीस लोखंडी रॉडने व लाथाबुक्याने मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली. तसेच या दोघांना साडी व धोतराने बांधून ठेवले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून दोन अंगठ्या, दोन पोते, कानातील झुंबर, दोन मनीमंगळसूत्र असे १ लाख ८२ हजारांचे सोन्याचे दागिने व ९० हजार रुपये रोख असा २ लाख ७२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

तसेच शेजारील कल्याण बाळासाहेब आंधळे व संजय अर्जुन खरड यांच्या वस्तीवर जाऊन चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. मात्र आरडाओरड झाल्यानंतर ग्रामस्थांनी प्रतिकार केल्याने चोरटे तेथून पसार झाले. त्यानंतर ओंबळे कुटुंबाला शेवगाव येथील रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. चोरीची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
तर सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी परिसरात पाहणी केली. ठसे तज्ञ व श्वान पथकही दाखल झाले. श्वानाने काही अंतरावर माग दाखविला. या चोरी प्रकरणी हरिभाऊ ओंबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब काटे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments