बाबुर्डी बेंद येथे २ दिवसांपासून बिबट्याचा वावर, वनविभागाने लावला पिंजरा



नगर तालुका (प्रतिनिधी)- नगर तालुक्यासह जिल्ह्यात बिबट्याने धूमाकूळ घातला आहे. त्यातच नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे सलग दोन दिवस बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान बिबट्याचे ठसे आढळून आल्याने ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वन विभागाने तात्काळ पाहणी करत हे ठसे बिबट्याचेच असल्याचे सांगितले. बिबट्याचे ठसे आढळून आल्याने वनविभागाने तात्काळ बिबट्या आढळून आलेल्या ठिकाणी पिंजरा लावला आहे.

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात बिबट्यांचा धूमाकूळ सुरु आहे. नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथील चिमुकलीला सायंकाळच्या वेळी अंगणात खेळत असतांना आईच्या समोरुन नेल्याची घटना घडली. तिचा मृतदेह दुसर्‍या दिवशी काटवनात सापडला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी निंबळकमध्ये एका मुलावर बिबट्याने हल्ला केला. दरम्यान, खारे कर्जुने येथे दोन बिबटे जेरबंद करण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. चास, कामरगाव, सारोळा कासार, हिंगणगाव, जखणगाव, जेऊर, निंबोडी, वाळकी परिसरातही बिबट्याचा वावर असल्याचे नागरिक सांगत आहेत. 

काही दिवसांपूर्वी खडकी येथे बिबट्याचे तीन पिल्ले आढळून आले होते. गेल्या दोन दिवसांपासून बाबुर्डी येथे अर्जुन चोभे, सुनिल चोभे यांच्या उसाच्या शेतात बिबट्या नागरिकांना दिसत आहे. तसेच बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. याची ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी योगेश चव्हाण यांनी ठश्यांची पाहणी केली. हे बिबट्याचेच ठसे असल्याचे त्यांनी पाहणीदरम्यान सांगितले. नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागानेही तात्काळ बिबट्या दिसला तेथे शेतात पिंजरा लावला आहे.

नारिकांनी काळजी घ्यावी

गेल्या दोन दिवसांपासून बाबुर्डी बेंद येथे बिबट्या वावरत आहे. बिबट्या असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. तसेच ठश्यांची पाहणी केली असता वनविभागाच्या कर्मचार्‍यांनीही बिबट्याचे ठसे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी मुलांची, जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य शरद चोभे, विजय वाळके, राम वाळके, डॉ. सुधीर चोभे,  वैभव खेंगट, अनिल चोभे यांच्यासह ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आले आहे.


 

0/Post a Comment/Comments