खा.निलेश लंके यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ग्रेट भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा

 


अहिल्यानगर - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी १९ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेऊन ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याचे आमंत्रण दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे साक्षीदार असलेल्या रायगडावर होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त करत, शक्य तितक्या प्रमाणात उपस्थित राहण्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी खा. लंके यांना दिली. या भेटीप्रसंगी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियंका गांधी तसेच महाराष्ट्रातील इतर खासदार उपस्थित होते.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी खा. लंके यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे मनःपूर्वक कौतुक केले. गड-किल्ले हे केवळ दगड-मातीचे अवशेष नसून ते स्वराज्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक असल्याचे सांगत, या मोहिमेमुळे तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जाणीव आणि अभिमान निर्माण होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अशीच लोकसहभागातून चालणारी मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत २५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अनेक सर्वसाधारण वाड्या-वस्त्या आजही पक्क्या रस्त्यांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून देत, अशा वाड्या-वस्त्यांना तातडीने रस्ते जोडणी करण्याची मागणी खा. लंके यांनी केली. पक्क्या रस्त्यांमुळे शिक्षण, आरोग्य आणि शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

खा. लंके यांनी अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले. सध्या सुरू असलेली कांद्याची निर्यात सुरूच ठेवण्यात यावी, अन्यथा बाजारपेठेत भाव कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सोबतच नाफेड व एनसीसीएफमार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या कांद्याच्या थकीत देयकांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ओझे वाढत असल्याचे सांगत, ही देयके तातडीने अदा करण्याची मागणी त्यांनी केली.

औद्योगिक विकासासाठी दळणवळणाची गरज

सुपा औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता, त्या अनुषंगाने सक्षम दळणवळण सुविधा आवश्यक असल्याचे खा. लंके यांनी नमूद केले. पुणेनगर रेल्वेलाईन प्रकल्प, पुणेनगर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे, तसेच पुणेछत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामाला गती देणे, या बाबी त्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणल्या. या प्रकल्पांमुळे औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकारात्मक निर्णयांचे आश्वासन

खा. लंके यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. विकास, शेतकरी हितसंबंध आणि सांस्कृतिक वारसा जपणे या तिन्ही बाबी केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.


 

0/Post a Comment/Comments