बापरे... नगर जिल्ह्यात आता १०० रुपयांच्या बनावट नोटा आल्यात चलनात



राहाता - राहाता तालुक्यातील गणेश परिसरात सध्या 100 रुपयांच्या बनावट नोटांचे एक मोठे जाळे सक्रीय झाले आहे. यामुळे सामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाची फसवणूक होत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियासह परिसरातील सर्व प्रमुख पतसंस्थांमध्ये या नोटा मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. सेंट्रल बँक, गुरुदत्त, वर्धमान आणि दत्तगुरु पतसंस्था यासारख्या संस्थांमध्ये या बनावट नोटा जमा होत आहेत. विशेष म्हणजे ज्या व्यापार्‍यांनी त्या स्वीकारल्या आहेत, त्यांना त्या नोटांचे मूल्य परत मिळत नाही. या नोटा ओळखणे सामान्य माणसाला कठीण आहे.

व्यापार्‍यांच्या मते हा गोरखधंदा श्रीरामपूरमधून चालतोय की गणेश परिसरातच त्याचे केंद्र आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. 100 रुपयांची नोट असल्याने ती सहजासहजी पकडली जात नाही, ज्यामुळे बनावट नोटा बनवणार्‍यांचे रॅकेट सध्या जोरात सक्रिय आहे. या रॅकेटमध्ये अनेक मोठे गुन्हेगार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जे लोक मोलमजुरी करून आपली रोजी-रोटी कमावतात, त्यांच्याकडे जर ही बनावट नोट आली तर त्यांची फसवणूक होते आणि त्यांना नुकसान सहन करावे लागते. बँक अधिकारी नोटा ‘डुप्लिकेट’चा शिक्का मारून बाद करतात, पण फसवणूक झालेल्या गरिबांनी तक्रार कोणाकडे करावी, हा गंभीर प्रश्न आहे. या बनावट नोटां’ना तातडीने आळा घालण्यासाठी आणि या रॅकेटला नेस्तनाबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.



0/Post a Comment/Comments