मुंबई - जून-ऑक्टोबर या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) शेती, पायाभूत सुविधा आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. यामुळे २९ जिल्ह्यांच्या १९१ तालुक्यातील १४ लाख ३६ हजार हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती. तसेच महाराष्ट्र सरकारने केंद्राला एक लाख १० हजार ३०९ हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितले.
त्यानंतर शेतकर्यांकडून सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी सरकारकडून मदतीसाठी केंद्राकडे अहवाल पाठविला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र आता खुद्द केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे मदतीसाठीचा औपचारिक प्रस्ताव पाठवलेला नाही, अशी माहिती लोकसभेत बोलतांना दिली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत माहिती देतांना सांगितले की,अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. मात्र, पाहणी होऊनही राज्य सरकारकडून अंतिम प्रस्ताव अद्याप केंद्राला प्राप्त झालेला नाही, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, राज्याच्या खात्यात सध्या १६१३ कोटी ५२ लाख रुपये शिल्लक आहेत. केंद्राचा प्रस्ताव प्रलंबित असला तरी राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीतून ४ हजार १७६ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. यात केंद्राचा वाटा ३१३२.८० कोटी रुपयांचा असून, हा निधी १५६६.४० कोटींच्या दोन टप्प्यांत राज्याला देण्यात आला आहे. राज्याच्या खात्यात सध्या १६१३ कोटी ५२ लाख रुपये शिल्लक आहेत, असेही शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
किती क्षेत्राचे नुकसान
एकूण प्रभावित शेतकरी – ०१,२५,६०२ हेक्टर
नष्ट झालेली शेती – ०१,१०,३०९ हेक्टर
मृत व्यक्ती – २२४
मृत जनावरे – ५९९

Post a Comment