नगर - पुणे महामार्गावर कंटेनरची ३ वाहनांना धडक, भीषण अपघातात १ ठार १ जखमी


नगर तालुका (प्रतिनिधी) - पुण्याहून नगरच्या दिशेने लोखंडी प्लेटा घेवून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनर वरील चालकाचे चास घाटात नियंत्रण सुटल्याने सदर कंटेनर रस्तादुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजूला गेला आणि या कंटेनर ने २ मालवाहतूक वाहने व एक बोलेरोला गाडीला धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून एका मालवाहू गाडीतील एक जण मयत झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. १६ जानेवारीला दुपारी १२.५० च्या सुमारास हा अपघात झाला.

यामध्ये सुपर कॅरी या मालवाहू वाहनातील शिवप्रसाद जनार्दनप्रसाद गौतम (वय ४५, रा.पद्मानगर, पाईपलाईन रोड, अहिल्या नगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) याचा मृत्यू झाला तर वाहन चालक सुग्रीम माणिकराम यादव (वय ३६, रा. कल्याणरोड, अहिल्यानगर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे दोघे १६ जानेवारीला दुपारी सुपर कॅरी या मालवाहू वाहनाने नगरहून सुप्याकडे जात होते. 

चास घाट चढून गेल्यावर पुण्याहून नगरच्या दिशेने लोखंडी प्लेटा घेवून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कंटेनर रस्तादुभाजक ओलांडून त्यांच्या गाडीला येवून धडकला. यात एकाचा मृत्यू तर एक जखमी झाला. तोच कंटेनर त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या आणखी एका मालवाहू वाहनाला तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोलेरो गाडीलाही धडकला. सुदैवाने या दोन्ही वाहनातील सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून कंटेनर चालकही जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते, पोलिस अंमलदार खंडेराव शिंदे, शरद दाते आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. तर अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.


 

0/Post a Comment/Comments