अहिल्यानगर - नगर शहरातील अत्यंत
प्रतिष्ठेच्या महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. या
निकालात नगर शहरासह महापालिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. संग्राम जगताप
(भैय्या) आणि भाजपचे नेते माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील (दादा) यांची जोडी
सुपरडुपर हिट ठरल्याचे दिसत आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून तिकिट वाटप, प्रचाराचे
योग्य नियोजन, वाढलेले इच्छुक असतांना सर्वांचे समाधान
करण्यासोबत सुनियोजित पध्दतीने मतदान घडवून आणल्याचा परिणाम मतमोजणीनंतर दिसून आला
आहे. मनपाच्या 68 जागांपैकी भैय्या आणि दादांच्या या
जोडगोळीने 52 जागांवर विजय संपादन करत नगर शहरावर त्यांचे
एकहाती वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे.
नगर शहरात लोकसभा निवडणुकीच्या
निकालानंतरच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप
यांनी आपला मोर्चा विकास कामांसोबतच हिंदूत्वाकडे वळवला. जगताप यांनी 180 अंशाच्या
काटकोनात बदलेली हिंदूत्वाची भूमिका हीच आज त्यांच्या यशाचे शिल्पकार असल्याचा
अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होताना दिसत असून तो अगदी तंतोतंत खरा आहे. नगर
शहर हे पूर्वीपासून हिंदूत्ववादी विचारांचे शहर होते. या ठिकाणी शिवसेनेच्या
माध्यमातून अडीचहून अधिक दशके शिवसेनेने नेते दिवंगत आ. अनिल राठोड यांचे वर्चस्व
होते. राठोड यांची हिंदूत्वाची कमी झालेली धग पुन्हा त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत
राष्ट्रवादी सारख्या धर्मनिरपेक्ष पक्षात असताना आ. संग्राम जगताप यांनी पुढे सुरू
ठेवली. याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होतांना दिसला.
पूर्वीपासून नगर शहरातील मध्यावर्ती भाग
हा हिंदूची वोट बँक होती. या मध्यवर्ती भागाला जोडून असणार्या काही भागातून
शिवसेनेसोबत भाजपलाही फायदा होत होता. पूर्वीच्या त्याच रणनितीचा फायदा घेत यंदा
देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगरच्या राजकारणात जगताप यांच्यासोबत जुळवून घेत
महापालिका निवडणूक लढवली. याचा फायदा दोनही पक्षांना झालेला दिसत आहे. यामुळे
महापालिकेत जगताप यांच्या राष्ट्रवादीने 27 तर भाजपने त्याखालोखाल 25 जागांवर विजय मिळवला आहे. शहरातील प्रतिष्ठेच्या या लढाईत ऐनवेळी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने महायुतीची साथ सोडली की त्यांना जगताप आणि विखे
यांनी बाजूला केले यापेक्षा संधी असताना देखील त्यांना शहरातील जुन्या शिवसेनेची
पोकळी भरून काढता आली नाही. यामुळे भविष्यात नगर शहरावर राष्ट्रवादीचे जगताप आणि
भाजपचे डॉ. विखे पाटील यांचे वर्चस्व राहिल, हे या निकालाने
आधोरेखीत केले आहे.
महाविकास आघाडीचा सुपडासाफ
महापालिका निवडणुकीत पहिल्या दिवसांपासून पिछाडीवर असणारी महाविकास
आघाडीचा मतमोजणीनंतर सुफडासाफ झाल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे
गटाचा एक तर काँग्रेसचे दोन ते (विशिष्ट भागातील) हे अपवाद वागळले तर नगर शहरात
महाविकास आघाडी पूर्णपणे संपल्यात जमा असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत महाविकास
आघाडीतील घटक पक्षाचे दोन अंक नगरसेवक निवडून आलेले नाहीत. यामुळे नगर शहरातील
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.
राष्ट्रवादीच ठरला मोठा भाऊ
2018 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेला 24, एकत्रित
राष्ट्रवादीला 18, भाजपला 14, काँग्रेसला 5, बहुजन समाज पक्षाला 4, समाजवादी पक्षाला 1 व अपक्ष 1 असे बलाबल होते. या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्षाचा
प्रशासकीय काळ व त्याआधीचा 5 वर्षांचा चौथ्या मनपाचा काळ मिळून सात वर्षात शहरातून
वाहणार्या सीना नदीच्या पात्रातून बरेचसे पाणी वाहून गेले. या काळात राज्यातील
एकत्रित शिवसेना व एकत्रित राष्ट्रवादी फुटली. त्यांची दोन शकले झाली. तशी ती
नगरमध्येही झाली. त्यामुळेच यंदाच्या महापालिका निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
नगरमध्ये महायुतीतील भाजप, अजितदादा राष्ट्रवादी व शिंदे सेना यांची महायुती एकत्रित
लढणार असल्याची चर्चा होती. पण जागा वाटपात बेबनाव झाला व शिंदे सेनेला
भाजप-राष्ट्रवादीने बाजूला ठेवले. त्यामुळे रिंगणात भाजप-राष्ट्रवादी युती विरोधात
शिंदे सेना व महाविकास आघाडी तसेच बहुजन समाज पक्ष, एमआयएम व अपक्ष अशी
लढत होती. यात राष्ट्रवादी अजितदादा गटाने तोच शहरात दादा असल्याचे सिद्ध केले व
सर्वाधिक 27 जागा जिंकून आता महापौर आमचाच असेही स्पष्ट केले आहे. अर्थात युतीचा महापौर
होणार असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. पण दावा सर्वाधिक जागा जिंकणार्या
राष्ट्रवादीचाच असणार आहे.
एमआयएमची एंट्री, शरद पवार गटाला भोपळा
नगर शहरातील महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ओवीसी यांच्या एमआयएम
पक्षाची एंट्री झाली आहे. एमआयएमचे दोन नगरसेवक मुकूंदनगर भागातून निवडून आलेले
आहेत. दुसरीकडे राज्याच्या राजकारणात प्रभावी गट असणार्या शरद पवार यांच्या
राष्ट्रवादीचे नगर शहरात मोठे हाल झालेले असून पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आलेला
नाही. यामुळे भविष्यात नगर शहराच्या राजकारणात शरद पवार गटाचे अस्तित्वाचा विषय
निर्माण होणार आहे.

Post a Comment