बापरे... नगरच्या मेडीकलमध्ये पारनेरच्या औषध विक्रेत्याने केला ४१ लाखांचा अपहार

 


अहिल्यानगर - शहरातील सथ्था कॉलनी परिसरातील एका नामांकित मेडीकलमध्ये तब्बल ४१ लाख १३ हजार ३८० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, व्यवसायात विश्वासू मानल्या जाणाऱ्या कामगारानेच ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राजेंद्र चंद्रकांत मुंडलिक (वय ५७, रा. डोळसेवाडा, माळीवाडा) यांचे स्टेशन रोडवरील खालकर हॉस्पिटलमध्ये 'साई मेडीकल' नावाचे दुकान आहे. या दुकानात सागर शिवाजीराव कोल्हे (रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर) हा तरुण औषध विक्रेता म्हणून कामाला होता. ग्राहकांना औषधांचे बिल देणे आणि पैशांचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

आरोपीने एप्रिल २०२४ ते जुलै २०२५ या काळात ग्राहकांना पूर्ण रकमेची बिले दिली आणि त्यांच्याकडून सर्व पैसे वसूल केले. मात्र, मालकाला हिशोब देताना त्याने संगणकीय प्रणालीमध्ये फेरफार करून बिलाची रक्कम कमी दाखवली. अशा प्रकारे बिलातील फरकाची रक्कम तो स्वतःच्या खिशात घालत राहिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुंडलिक यांनी सर्व बिलांची तपासणी केली असता त्यात ४१ लाख १३ हजार ३८० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम ३१८ (), ३१६ () प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments