शारजा ते कुवेत दरम्यान समुद्रात जहाजावर अडकला नगर जिल्ह्यातील तरुण



श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्र. 7 मधील पूर्णवादनगर येथील एक तरुण दुबईजवळील शारजा ते कुवेत दरम्यान सुमारे सात ते आठ कि.मी. अंतरावर समुद्रामध्ये जहाजावर अडकला आहे. गणेश मुकुंद जाधव असे या तरुणाचे नाव असून तो मुंबई येथील ‘द ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनी लि.’ या शिपिंग कंपनीत नोकरीस असून, त्यांच्या कंपनीचे जहाज गेल्या आठवड्यात कुवेत येथे गेले होते. हा तरुण सध्या ज्या जहाजावर आहे, त्या जहाजावर 48 हजार टन गॅस आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ते सध्या शारजा शहरापासून जवळपास सात ते आठ कि.मी. अंतरावर समुद्रात थांबलेले आहे.

अमेरिकेने इराणवर हल्लाबोल केल्यानंतर जागतिक स्तरावर या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यांचे जहाज कुवेत परिसरात असताना त्यांच्यापासून जवळच्या अंतरावर मिसाईलचे स्फोट झाले. जहाजावर मोठ्या प्रमाणात गॅस असल्याने त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने शारजा शहरापासून सुमारे सात ते आठ कि.मी. अंतरावर समुद्रामध्ये जहाज थांबविलेले आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारत देशातील अनेक प्रवासी बाहेरच्या देशांमध्ये अडकलेले आहेत. त्यातच श्रीरामपूर शहरातील पूर्णवादनगर येथील हॉटेल व्यावसायिक मुकुंद जाधव यांचा मुलगा गणेश जाधव हा देखील त्यांच्या कंपनीच्या जहाजावर अडकलेला आहे.

आखाती देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. सर्व प्रकारच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. इकडे श्रीरामपुरात त्याचे कुटुंबीय काळजीत पडले असून, मुलाच्या सुखरूप घरी पोहोचण्याची वाट पाहत आहेत. गणेशचे वडील मुकुंद जाधव यांनी याबाबत अहिल्यानगर येथे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती दिली आहे. त्यांनीही वरिष्ठ पातळीवरून जे निर्णय होतील, त्याप्रमाणे मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गणेश जाधव हा गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई येथील द ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनी लि. या कंपनीत कामावर रुजू झालेला आहे.

हे ही वाचा ...

जीवघेण्या आजाराशी झुंजतेय मराठी अभिनेत्री

संजू सॅमसनचं आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये वादळ!

0/Post a Comment/Comments