मुंबई - मोठ्या पडद्यासह ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajashree Deshpande) सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. सेक्रेड गेम्स, ट्रायल बाय फायर यासारख्या गाजलेल्या वेब सिरीजमधून दमदार भूमिकांसाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. सोशल मीडियावर तिने बुधवारी एक भावनिक पोस्ट शेअर करत तिला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिली. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. अनेक कलाकार तिला लवकर बरी हो असं म्हणत कमेंट करत आहेत.
राजश्रीला स्तनाचं कर्करोग असल्याचं निदान झाल्यानंतर तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. तिने instagram वर नुकतीच हेल्थ अपडेट शेअर केली असून तिच्या अनेक सहकाऱ्यांनी कमेंट करत तिच्या जिद्दीचा कौतुक केलंय. ही पोस्ट शेअर करताना माझ्या आई-वडिलांना हे सत्य सांगण्याचा धाडस माझ्यात आलंय असं म्हणत ही बातमी शेअर केली. सध्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ती बरी होत असल्याचं तिनं या पोस्टमध्ये सांगितलं आहे. instagram वर राजश्रीने रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने एनफिल्ट्रेटींग ड्युकटल कॅर्सीनोमा म्हणजेच ग्रेड 1 प्रकारचा स्तनाचा कर्करोग असल्याचं नमूद केलं.
राजश्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं," तुम्ही हे वाचत आहात, याचा अर्थ मी अखेर माझ्या आई-वडिलांना सांगण्याचं धैर्य एकवटलं आहे की मला Infiltrating Ductal Carcinoma (NOS) – ग्रेड 1 स्तनाचा कर्करोग असल्याचं निदान झालं आहे.
आता तुम्हा सगळ्यांनाही हे सांगण्याची वेळ आली आहे. सुदैवाने, नियमित तपासणीदरम्यान हा आजार अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आढळला आणि त्यामुळे आम्हाला लढण्याची संधी मिळाली. असंख्य तपासण्या, शस्त्रक्रिया हा सगळा प्रवास एखाद्या रोलरकोस्टरसारखा होता. पण विश्वास ठेवा, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आपुलकीने मला यातून ताकद दिली. शस्त्रक्रियेनंतर आई आणि पप्पांच्या चेहऱ्यावरचा दिलासा पाहिला आणि माझी भीती वितळून अटळ शक्तीत बदलली. सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आता मला जग जिंकण्याची तयारी असल्यासारखं वाटतंय.
आता मी हळूहळू पूर्णपणे बरी होत आहे आणि लवकरच रुग्णालयातून घरी परतणार आहे. डॉ. मंदार नाडकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे आणि काळजीमुळे हा प्रवास अधिक सौम्य झाला.तुमचं प्रेम हीच माझी खरी औषधं आहेत. आता पुढे आहे उपचार, आशा आणि अधिक उजळ दिवसांची सुरुवात. 2026 ची सुरुवात मी खूप उत्साहाने केली होती. ग्रामीण भागात आणखी दोन शाळा सुरू करण्याचं नियोजन, एका नदीच्या प्रवाहाचं पुनरुज्जीवन आणि काही अप्रतिम कथा शूट करण्याचं स्वप्न. मी पूर्ण ऊर्जेने आणि उद्देशाने भारलेली होते. आणि काहीच बदलणार नाही. हे सगळं होणारच, कदाचित आणखी सुंदर पद्धतीने.
मी या नव्या प्रवासात श्रद्धा, धैर्य आणि प्रेमाने भरलेल्या हृदयासह पाऊल टाकते आहे. हा माझ्या आयुष्यातला एक अध्याय आहे, संपूर्ण कहाणी नाही. आता एक कर्करोग योद्धा, सामाजिक कार्यकर्ती आणि एक माणूस म्हणून माझी ऊर्जा, करुणा आणि जिद्द अधिक दृढ झाली आहे. विशेषतः स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अजून खूप काम करायचं आहे.म्हणूनच मनापासून हे तुमच्याशी शेअर करत आहे. तुमच्या प्रार्थनांमध्ये मला आठवा, जेणेकरून मी पुन्हा उंच भरारी घेऊ शकेन आणि दिलेली प्रत्येक वचनं पूर्ण करू शकेन.
ही पोस्ट माझ्या मोठ्या, तेजस्वी स्मितासह शेअर करते आहे. कारण माझं हास्य अजूनही तितकंच उजळ आहे आणि माझी जिद्द त्याहून अधिक प्रकाशमान आहे. तुमचे सगळे संदेश, व्हॉइस नोट्स मी वाचते आहे, ऐकते आहे आणि शक्य तितक्या सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते आहे. तुमच्यावर मनापासून आणि अखंड प्रेम.

Post a Comment