तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?


अहिल्यानगर - बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध अध्यात्मिक केंद्र असलेल्या श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्याबाबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने वारकरी संप्रदाय आणि भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली आहे. महाराजांनी स्वतःवरच शस्त्राने वार करुन स्वतःला जखमी करून घेतल्याची घटना समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनीच व्हिडिओद्वारे दिली.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील महिंदा गावात तारकेश्वर गड हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या गडाचे प्रमुख महंत म्हणून आदिनाथ महाराज शास्त्री कार्य पाहतात. घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास महाराजांनी गडावरील सर्व भक्तांना खोलीच्या बाहेर थांबण्यास सांगितलं. ते स्वतः खोलीत गेले. त्यानंतर त्यांनी शस्त्राने वार करुन स्वतःला गंभीर जखमी केलं. ही बाब लक्षात येताच गडावरील सेवकांनी आणि भक्तांनी तातडीने त्यांना उपचारासाठी हलवलं.

वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया

महाराजांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉ. हर्षवर्धन तनवर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने महाराजांवर तातडीने शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून महाराजांची प्रकृती आता स्थिर आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पुढील आठ दिवस महाराजांना कोणालाही भेटू दिलं जाणार नाही. भक्तांनी रुग्णालयात गर्दी करु नये आणि महाराजांना विश्रांती घेऊ द्यावी, असे आवाहन डॉ. तनवर यांनी केलं आहे.

महाराजांकडून प्रकृतीविषयी माहिती

या घटनेनंतर चिंतेत पडलेल्या भक्तांना स्वतः महाराजांनी संदेश देत दिलासा दिला आहे. माझी तब्येत आता चांगली आहे. कोणीही काळजी करु नका, मी लवकरच गडावर येणार आहे, असा संदेश आदिनाथ शास्त्री महाराजांनी आपल्या भक्तांना दिल्याने त्यांच्या अनुयायांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे.

राजकीय आणि सामाजिक पडसाद

या घटनेची माहिती मिळताच भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले आणि आमदार मोनिका राजळे यांनी रुग्णालयात धाव घेऊन महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली. महाराजांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्यांच्यावर योग्य उपचार झाले आहेत. भाविकांनी कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम राखावा, असे आवाहन अक्षय कर्डिले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

भक्त परिवारात चिंतेचं वातावरण

आदिनाथ महाराज शास्त्री यांचा बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मोठा भक्त परिवार आहे. वारकरी संप्रदायात त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराजांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन या घटनेचा अधिक तपास करत आहेत. सध्या गडावर आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, महाराज लवकर बरे व्हावेत यासाठी भक्त प्रार्थना करत आहेत.

 


0/Post a Comment/Comments