जुगार क्लब चालकाला ५ हजाराचा हप्ता मागणाऱ्या पोलिसाला ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले


अहिल्यानगर - जुगाराचा क्लब सुरळीत चालू ठेवण्यासाठी क्लबचालकाकडून ५ हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचार्‍याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. दीपक सर्जेराव पवार (वय ३९, रा. मिरजगाव, ता.नगर) असे या पोलिसाचे नाव आहे. २३ एप्रिल रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.

लाचखोर पवार हा कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याने मिरजगाव परिसरातील क्रांती चौकात चालणार्‍या जुगार क्लबच्या चालकाकडे क्लब सुरळीत चालू ठेवण्यासाठी दरमहा ५ हजार रुपयांचा हप्ता मागितला. हप्ता न दिल्यास क्लब वर कारवाई करण्याची धमकी दिली होती. संबंधित व्यक्तीने याबाबत अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली होती.

या तक्रारीची २३ एप्रिल रोजी मिरजगाव पोलिस ठाण्याच्या आवारात पडताळणी केली असता पोलिस पवार याने तक्रारदाराकडे लाच मागणी करून ती स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे दुपारी सुमारे ३ वाजता मिरजगाव येथील क्रांती चौक परिसरात एका ज्यूस सेंटर वर आरोपी पवार यांना बोलावण्यात आले. तक्रारदाराने त्यांना ठरलेली ५ हजार रुपयांची रक्कम दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत पवार यांना रंगेहात पकडले. त्याच्या विरुद्ध मिरजगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, बाबासाहेब कर्‍हाड, रवी निमसे व चालक हारून शेख यांनी केली आहे.


 

0/Post a Comment/Comments