नगर तालुक्यात सोलर कंपनीच्या संचालकाला मागितली २ कोटींची खंडणी


नगर तालुका (प्रतिनिधी) - सोलर प्रकल्पाचे काम सुरु ठेवण्यासाठी कंपनीच्या संचालकाला मागितली २ कोटींची खंडणी मागितली, तसेच संचालकासह कामगारांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत सोलर प्रकल्पाच्या अंडर ग्राऊंड केबल लाईनचेही नुकसान केल्याची घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या शिवारात २७ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात २८ एप्रिल रोजी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सनस्ट्रीम ग्रीन एनर्जी प्रा.लि. या कंपनीचे संचालक करण दिपक भद्रा (वय ३८, रा. घाटकोपर ईस्ट, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या कंपनीच्या वतीने चिचोंडी पाटील शिवारात सोलर प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. या ठिकाणी २७ एप्रिल रोजी रात्री पोपट गजानन कोकाटे, ओंकार पोपट कोकाटे, अंबादास गजानन कोकाटे (सर्व रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) हे गेले. त्यांनी सोलर प्रकल्पाच्या अंडर ग्राऊंड केबल लाईनचे नुकसान करत तेथे असलेले कंपनीचे संचालक करण भद्रा यांना सोलर प्रकल्पाचे काम सुरु ठेवण्यासाठी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली.

ती देण्यास नकार देताच आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. नंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांचे कामगार तेथे आले असता आरोपींनी त्यांना ही शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी भद्रा यांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच २८ एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  


 

0/Post a Comment/Comments