नगरमध्ये बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशाला चाकू - कोयत्याने वार करून लुटले


अहिल्यानगर - पुणे येथे कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या एका तरुणाला दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवर जबरदस्तीने बसवून निर्जन स्थळी नेले. तेथे चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जवळील रोख रकमेसह बॅग लुटून नेल्याची घटना २२ एप्रिल रोजी रात्री ११.३० च्या सुमारास स्वस्तिक चौकातून आनंदऋषी हॉस्पिटल कडे जाणाऱ्या बोळीत घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत गणेश विज टोकसे (वय ३५, रा. सौंदाणे, ता. मालेगाव, जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पुण्यातील बावधन येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. दि. २२ एप्रिल रोजी ते आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अहिल्यानगरमध्ये आले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास पुणे बसस्थानक (स्वास्तिक चौक) येथे ते बसची वाट पाहत उभे असताना, पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी गणेश यांना खोली पाहिजे का? अशी विचारणा केली. गणेश यांनी नकार दिला असता, दोन्ही आरोपींनी त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून हॉटेल रेडियन्स जवळून आनंदऋषी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या अंधाऱ्या गल्लीत नेले.

त्या ठिकाणी आरोपींनी गाडीतील चाकू आणि कोयता काढून गणेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि पैशांची मागणी केली. गणेश यांनी प्रतिकार केला असता, आरोपींनी त्यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर कोयत्याने सपासप वार केले. या झटापटीत आरोपींनी गणेश यांच्याकडील तीन हजार रुपये रोख आणि कपड्यांची बॅग हिसकावून घेतली. गणेश यांनी आरडाओरडा केल्याने पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी दुचाकीवरून पसार झाले. जखमी गणेश यांनी तत्काळ नातेवाईकांशी संपर्क साधला, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments