नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर - जामखेड रस्त्यावर चिचोंडी पाटील परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या महिला मोटार वाहन निरीक्षकाचे शासकीय वाहन अडवून त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची तसेच त्यांनी जप्त केलेली ओहरलोडेड मालट्रक पळवून नेल्याची घटना २४ एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक आयेशा अश्फाक हुसैन (वय ३६, रा. गुलमोहर रोड, अहिल्यानगर) या वायु वेग पथक क्रमांक २ वर कार्यरत असताना ही घटना घडली. त्यांनी ओव्हरलोड असलेल्या एका सहा टायर ट्रकवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. सदर वाहन शासकीय कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना आरोपी संतोष भस्मे (रा.पिंपळा, ता. आष्टी), अजिनाथ बेरड(रा. निंबोडी, ता.नगर), धोंडीराम तुळशीराम निक्रड (रा. मांडवे, ता.नगर) आणि जगताप (पूर्ण नाव माहित नाही)यांनी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारने निरीक्षक हुसैन यांचे वाहन अडवले.
आरोपींनी हुसैन यांच्या ताब्यातील जप्त केलेले वाहन पळवून नेले आणि त्यांना 'तू नोकरी कशी करते ते बघतो' अशी धमकी देऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याबाबत निरीक्षक हुसैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १३२,२२१,३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment