खळबळजनक...भावाला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला

 


अहिल्यानगर - शहरातील नालेगाव परिसरातील जनकल्याण रक्तपेढीजवळ एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना २० एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास घडली. या मारहाणीत करण दीपक लांडे (वय २१, रा. ठाणगे मळा, नालेगाव) हा जखमी झाला असून जुन्या वादातून आणि भावाला केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी शिवाजी बाबुराव अनभुले (रा. कुंभार गल्ली, नालेगाव), संभाजी बाबुराव अनभुले (जनकल्याण रक्तपेढीजवळ, नालेगाव)आणि राहुल बाळासाहेब वाकळे (रा. नेप्ती नाका) या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण लांडे हा रात्रीच्या सुमारास आपल्या घराकडे जात असताना आरोपी तेथे आले. आरोपी राहुल वाकळे हा दुचाकी चालवत होता, तर शिवाजी अनभुले याच्या हातात लोखंडी चॉपर होता. आरोपींनी फिर्यादीला गाठून काही समजण्याच्या आतच त्यांच्यावर पाठीवर आणि दंडावर वार केले. 'हा भावाला मारल्याचा बदला आहे' असे ओरडत आरोपींनी लाकडी दांडक्यानेही बेदम मारहाण केली.

हल्ल्यानंतर जखमी तरुणाने आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले, त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणावर मॅककेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक फौजदार गोरडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

 


0/Post a Comment/Comments