मुलाला पोहायला शिकवताना वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू: सुदैवाने मुलगा बचावला



श्रीगोंदा - मुलाने पोहण्यात पारंगत व्हावे, या उद्देशाने नदीवर गेलेल्या पित्यावर काळाने झडप घातली. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रविवारी (दि.१२) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत अमित रंगनाथ साठे (वय ४०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रसंगावधान राखत एका तरुणाने उडी घेतल्याने त्यांच्या ९ वर्षीय मुलाचा जीव वाचला, मात्र वडिलांना वाचवण्यात अपयश आले.

अमित साठे हे आपला मुलगा साहिल (इयत्ता ४ थी) याला पोहायला शिकवण्यासाठी गावातील गावातील संत निमराज महाराज मंदिर व दधीची ऋषी मंदिराच्या मागील सिद्ध नदीवरील ''केटी वेअर''च्या साठवलेल्या‎पाण्यात घेऊन गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न‎ आल्याने अमित साठे बुडू लागले. पित्याला बुडताना पाहून‎ साहिलही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याच वेळी‎ जवळून जाणारा तरुण सुधीर धोत्रे याच्या ही घटना लक्षात‎आली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेतली‎ आणि साहिलला सुखरूप बाहेर काढले.‎ 

नवनाथ जाधव‎ यानेही अमित साठे यांना शोधण्यासाठी अर्धा तास पाण्यात ‎झुंज दिली, मात्र पाण्याचा अंदाज येत नसल्याने अखेर‎ त्याला बाहेर यावे लागले. घटनेची माहिती मिळताच‎ बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सरपंच आणि‎ ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू झाली.‎ 

रायगव्हाण‎ येथील एकलव्य संघटनेच्या काळू निकम, करण माळी,‎ राहुल गायकवाड, बन्नी जाधव, दादू गायकवाड यांनी ‎अथक परिश्रमानंतर अमित साठे यांचा मृतदेह बाहेर ‎काढला. दौलत नाना शितोळे यांची ''डिसास्टर रिस्क्यू फोर्स''‎आणि रांजणगाव एमआयडीसीचे अग्निशामक दलही‎ मदतीला पोहोचले होते. अमित साठे यांचा मृतदेह‎ शवविच्छेदनासाठी शिरूर येथे पाठवण्यात आला‎.बेलवंडी पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.‎


 

0/Post a Comment/Comments