नेवासा - उपनगराध्यक्षांच्या पतीचा नगरपंचायतच्या मुख्याधिकार्‍यांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार



नेवासा - माझ्या चारचाकी वाहनातून शासकीय कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जात असताना रात्री पावणेआठच्या सुमारास उपनगराध्यक्षांचे पतीने नेवासा येथे आपल्यावर जीवे मारण्याच्या हेतूने कट्ट्यातून गोळी झाडल्याची फिर्याद नगरपंचायतच्या मुख्याधिकार्‍यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिली असून त्यावरुन आम आदमी पक्षाचे नेते व उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांचे पती संजय सुखदान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी निखिल लक्ष्मण फराटे (वय 40) रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 13 एप्रिल रोजी रोजी रात्री पावणेआठ वाजण्याचे सुमारास मी माझ्या चारचाकी वाहनामध्ये (एमएच 12 व्हीव्ही 7213) बसून जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासकीय कामासाठी जात असताना संजय लक्ष्मण सुखदान याने त्याच्या ताब्यातील बुलेट मोटार सायकलने मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या चारचाकी गाडीवर जोराची धडक दिली.

म्हणून मी घाबरुन तेथून गाडीमध्ये बसून नेवासा फाट्याकडे जात असताना नेवासा शहरातील खोलेश्वर मंदिराच्या चौकाच्या पुढे आलो असता तेथे संजय सुखदान हा त्याच्या बुलेट मोटारसायकलवर जोरात आला व त्याची बुलेट मोटारसायकल माझ्या चारचाकी गाडीला आडवी लावली, म्हणून मी गाडीच्या खाली उतरलो असता संजय सुखदान याने त्याच्या कंबरेला हात घालुन गावठी कट्ट्यातून माझ्या दिशेने फायर केला. म्हणून मी पटकन खाली वाकलो. त्यामुळे मला गोळी लागली नाही. त्याचवेळी संजय सुखदान याने दुसरा फायर केला असता त्याच्या गावठी कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने फायर झाला नाही म्हणून मी वाचलो व घाबरुन तेथून गाडीमध्ये बसून निघून गेलो.

तसेच मी नेवासा नगरपंचायतमध्ये शासकीय कर्तव्य पार पाडत असताना संजय सुखदान हा तेथे येवून मला अर्वाच्य भाषेत शिवागीळ करुन मला जिवे मारण्याची धमकी देवून मी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला आहे. म्हणून माझी संजय लक्ष्मण सुखदान (रा. नेवासा) याच्याविरुध्द फिर्याद आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात संजय सुखदान यांच्यावर शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 25, 3, भारतीय न्याय संहिता कलम 109(1),126(2), 132, 351(2), 351(3), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0/Post a Comment/Comments