भोंदूबाबाचा कारनामा... पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष आणि ५ जणांना १ कोटीला गंडा



पारनेर - पारनेर तालुक्यातील निघोज येथे अंधश्रद्धा आणि झटपट श्रीमंतीच्या आमिषाला बळी पडून पाच जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शिरूर येथे वास्तव्यास असल्याचे सांगणार्‍या एका भोंदूबाबाने पैशांची पूजा केल्यास १० पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून संबंधितांना जाळ्यात ओढले. निघोजमधील एका व्यक्तीशी ओळख वाढवत भोंदूबाबाने आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा केला. बनावट भक्तांच्या माध्यमातून विश्वास संपादन करून त्याने संबंधित व्यक्तीला तसेच इतर चार जणांना पैशांच्या पावसाचे स्वप्न दाखवले.

त्यानंतर पाचही जणांनी जमीन गहाण ठेवणे, दागिने तारण ठेवणे तसेच सावकारांकडून कर्ज घेऊन एकूण १ कोटी रुपयांची रक्कम उभी केली. दरम्यान, ठरलेल्या दिवशी रात्रीच्या वेळी पूजा आयोजित करण्यात आली. पूजेदरम्यान भोंदूबाबाने सर्वांना मौन पाळण्यास सांगून ‘तीर्थ’ दिले. हे तीर्थ घेतल्यानंतर काही वेळातच सर्वजण बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. शुद्धीवर आल्यानंतर भोंदूबाबा आणि पैशांची रक्कम दोन्ही गायब झाल्याचे लक्षात आले.

फसवणूक झाल्यानंतर संबंधितांनी शिरूर तसेच गुजरातपर्यंत भोंदूबाबाचा शोध घेतला, मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. या घटनेबाबत गावात दबया आवाजात चर्चा सुरू असली तरी अद्याप पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंधश्रद्धा व भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सजग राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


 

0/Post a Comment/Comments