भाजप प्रवेश आणि ईडीच्या विषयावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी मांडली रोखठोक भूमिका



अहिल्यानगर - राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट सांगितले की, ते कोणत्याही नव्या पक्षात जाणार नसून ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याच भूमिकेत ठाम आहेत.

राहुरी पोटनिवडणुकीपासून तनपुरे काहीसे दूर राहिल्याचे चित्र दिसत होते. यावर त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही केवळ पोटनिवडणूक असल्यामुळे सरकारच्या सत्तासमीकरणावर त्याचा काहीही परिणाम होणार नव्हता. शिवाय कर्डिले यांच्या निधनामुळे या निवडणुकीला दुःखाची छाया आहे. त्यामुळे राजकीय आक्रमकता न दाखवता सामंजस्याची भूमिका घेण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारकडून मदत घेणे चुकीचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका दिसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. बारामतीत शरद पवार गटाने उमेदवार दिला नाही, मात्र राहुरीत उमेदवार उभा केला. यावर तनपुरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका होती. मात्र काँग्रेसकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने भविष्यात त्या जागेवर दावा निर्माण होऊ शकतो, या शक्यतेमुळेच पक्षाने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असावा.

भाजपमध्ये प्रवेश करणार का, या चर्चांवर त्यांनी ठामपणे उत्तर दिले. मी कधीही भाजपमध्ये जाणार असल्याचे बोललो नाही. या केवळ अफवा आहेत, असे ते म्हणाले. या निवडणुकीत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली असली तरी कोणत्याही पक्षाच्या प्रचारमंचावर ते गेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचाच कार्यकर्ता आहे, असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय निष्ठेबाबत कोणतीही शंका राहू दिली नाही.

काल आलेला निकाल हा केवळ योगायोग

दरम्यान, साखर कारखाना व्यवहाराशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून ईडीकडून त्यांची मुक्तता झाल्यानेही राजकीय चर्चांना उधाण आले होते. याबाबत त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा आणि निवडणुकीचा काहीही संबंध नाही. वर्षभरापूर्वीच या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता आणि तीन महिन्यांपूर्वी न्यायालयाने तो स्वीकारला होता. काल आलेला निकाल हा केवळ योगायोग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


 

0/Post a Comment/Comments