नगर तालुका (प्रतिनिधी) - शेतात काम करत असलेल्या सासू सुनेला दोघा चोरट्यांनी बेदम मारहाण करत त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळवून नेल्याची घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात पिंपळा गावाकडे जाणाऱ्या रोड लगत २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
याबाबत ताराबाई मुरलीधर कोकाटे (वय ६५, रा.चिचोंडी पाटील, ता.नगर) यांनी २१ एप्रिल रोजी फिर्याद दिली आहे. चिचोंडी पाटील शिवारातील शेत गट क्रमांक ८०४ मध्ये पिंपळा जाणारे रस्त्याजवळ फिर्यादी आणि त्यांची सून काम करत होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या. या दोघांनी अचानक फिर्यादी महिलेवर लाकडी काठीने हल्ला चढवला, तसेच त्यांच्या सुनेलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादींच्या दोन्ही कानांना आणि डाव्या पायाला गंभीर जखम झाली आहे.
या मारहाणीनंतर आरोपींनी फिर्यादींच्या कानातील सोन्याची कर्णफुले, गळ्यातील सोन्याचे मणी असलेली पोत आणि त्यांच्या सुनेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र असा एकूण ७८ हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने ओरबाडून नेला. दागिने लुटल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पिंपळा गावाच्या दिशेने फरार झाले. जखमींवर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी २ अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

Post a Comment