अहिल्यानगर - केडगाव उपनगरात १४ मे रोजी भरदिवसा २ ठिकाणी चोरट्यांनी घरे फोडून चोऱ्या केल्या. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेली आहे. दरम्यान एका घरात चोरटे घुसल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी २ चोरट्यांना त्या घरातच कोंडून ठेवत पोलिसांच्या हवाली केले आहे.
घरफोडीची पहिली घटना दुपारी १२.१५ ते २.३० च्या दरम्यान केडगाव येथील इंडस्ट्रियल एरिया भागात असलेल्या समर्थ नगरमध्ये राजू सोन्याबापू गहीले यांच्या साईलिला निवासस्थान येथे घडली. फिर्यादी राजू गहीले हे दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुपारी १२:१५ ते २:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत हॉलमधील टीव्ही युनिटच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, अडीच हजार रुपयांच्या चांदीच्या रिंग आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादी दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटल्याचे आणि चोरी झाल्याचे लक्षात आले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि इतर अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गाजरे करत आहेत.
दुसरी घटना भुषणनगरच्या झेंडा चौक परिसरात घडली. या भागात आरटीएम जीमच्या शेजारी राहणारे शिवाजी गोविंद बोऱ्हाडे (वय ५७) यांच्या घराचा लोखंडी व लाकडी दरवाचा चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपात तोडून त्यात ठेवलेले १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरले.
नागरिकांच्या सतर्कतेने चोरटे जेरबंद
दरम्यान या घरात चोरटे घुसले असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तेथे जमा होत सदर घराचा दरवाजा बाहेरून लावून घेत चोरट्यांना घरातच कोंडून ठेवले. तसेच याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घरात कोंडून ठेवलेल्या शंकरलाल जगदीश (वय २५,रा. नशिराबाद,जि.अजमेर, राजस्थान) व अजय बद्री (वय १८, रा. जैसलमेर जवळ, राजस्थान) या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी शिवाजी बोऱ्हाडे यांच्या फिर्यादी वरून ताब्यात घेतलेल्या दोघांवर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment