अहिल्यानगरमध्ये डॉक्टरला रस्त्यात अडवून लुटले, २ तोळ्याची सोन्याची चेन लंपास



अहिल्यानगर - शहर परिसरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, प्रेमदान हडको परिसरात दोन अनोळखी चोरट्यांनी एका डॉक्टरला रस्त्यात अडवून त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत डॉ. उमेशचंद्र जनार्दन मोरे (वय ४९, रा. पाईपलाईन रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रात्रीच्या वेळी पाईपलाईन रोड परिसरातील अरिहंत बॉडी सपोर्ट सर्जिकल या दुकानात जात होते. ते प्रेमदान हाडको येथील महादेव मंदिराजवळ आले असता, दोन अनोळखी इसम अचानक त्यांच्या समोर आले. या चोरट्यांनी काही कळण्याच्या आतच मोरे यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली.

चोरी केल्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून त्वरित पळ काढला. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनंतर तोफखाना पोलिसांनी अनोळखी चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांनी परिसराची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी सुरु केली आहे.

 


0/Post a Comment/Comments