अहिल्यानगर - भारत निवडणूक आयोगाच्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कर्तव्यात कसूर आणि टाळाटाळ केल्याप्रकरणी सावेडी येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) राजेंद्र बबन फुलारी यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुनील बाजीराव नेटके यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुनील नेटके हे पेमराज सारडा कॉलेजमध्ये ग्रंथालय लिपीक असून, मे २०२५ पासून निवडणूक शाखेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अंतर्गत एकूण १० बीएलओ काम पाहतात, ज्यामध्ये आरोपी राजेंद्र फुलारी यांचा समावेश आहे.
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदार यादी अद्ययावत करणे आणि मतदार मॅपिंगचे अत्यंत महत्त्वाचे काम चालू आहे. महानगरपालिका कर्मचारी असलेल्या राजेंद्र फुलारी यांची सन २०२३ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यांनी १६ एप्रिल २०२६ ते ११ मे २०२६ या काळात निवडणूक कामात मोठ्या प्रमाणावर विलंब, टाळाटाळ आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. हे काम राष्ट्रीय स्वरूपाचे आणि गंभीर असल्याने वरिष्ठांनी त्यांना दैनंदिन बैठकांद्वारे तसेच लेखी आणि तोंडी स्वरूपात अनेकदा समज दिली होती.
कामात सुधारणा करून हजर होण्याबाबत ११ मे रोजी लेखी आदेश देऊनही फुलारी यांनी मॅपिंगचे कोणतेही काम केले नाही. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याने सहायक मतदार नोंदणी अधिकारी स्वप्निल ढवळे यांच्या लेखी आदेशानुसार ही तक्रार करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी आरोपी राजेंद्र बबन फुलारी यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment