अहिल्यानगर - नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारातील बारेळा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून तीन बिबट्यांनी धुाकूळ घातला असून, पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याबरोबरच १४ मे रोजी सायंकाळी एका लहान बालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी १५ मे रोजी दुपारी वनविभागाचे कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केले.
बारेळा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. मात्र बिबट्या या पिंजर्याला हुलकावणी देत आहे. गेल्या दहा-बारा दिवसांत बिबट्याने शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करत त्यांचा फडशा पाडला आहे. १४ मे रोजी पहाटे चिकू इनामदार यांच्या गोठ्यात घुसून शेळी ओढून नेत तिला ठार केले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा इनामदार यांच्या घराभोवती दोन बिबटे घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले. तसेच परिसरातच आणखी एक तिसरा बिबट्या नागरिकांनी पाहिला. यातील एका बिबट्याने बालकावर हल्ल्याचा प्रयत्नही केला. मात्र परिसरातील काहींनी मोठ्याने आरडाओरड केल्याने सुर्दैवाने तो बालक बचावला.
याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर रात्री वनविभागाचे पथक तेथे आले. या पथकाने ड्रोनद्वारे परिसरात पाहणी केली असता ड्रोनमध्ये तीन बिबटे असल्याचे दिसून आले. मात्र या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत ४० ते ५० नागरिकांनी रात्री उशीरापर्यंत वनविभागाच्या पथकासोबत परिसरात गस्त घालत पाहणी केली. रात्री उशीरा ड्रोनचे चार्जिंग संपल्यामुळे वनविभागाचे पथक निघून गेले. मात्र नागरिकांच्या भितीने झोप उडाली. मळ्यातील सर्वांनी रात्र अक्षरशः जागून काढली. हे बिबटे पिंजर्याला हुलकावणी देत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना बेशुध्द करून पकडण्यात यावे किंवा गोळ्या घालून ठार मारण्याची परवानगी वरिष्ठ कार्यालयाकडून घ्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी १५ मे रोजी दुपारी वनविभागाच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात नगर बाजार समितीचे सहसचिव संजय काळे, सोसायटीचे संचालक जयप्रकाश पाटील संजय पाटील, बोरमळ्यातील नवनाथ कडूस, मयूर काळे, युनूस इनामदार, चिकू इनामदार, संजय हारदे, सचिन कडूस, सोनाथ कडूस, मतीन इनामदार, महेश वाव्हळ, बाळासाहेब वाव्हळ, जनार्दन गायगोवे, सतीश ढोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
आ. काशिनाथ दातेंकडून आंदोलनाची दखल
दरम्यान हे आंदोलन सुरु असताना आ. काशिनाथ दाते यांनी आंदोलकांशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्याशी संपर्क साधून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच डीपीडीसी च्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशीही या बिबट्यांचा कसा बंदोबस्त करता येईल याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

Post a Comment