नगर तालुका (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील खंडाळा शिवारात एका घराचे पाठीमागचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अतिष भिमराव नवले (वय २५, रा. खंडाळा, ता.नगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १५ मे रोजी रात्री ११ ते १६ मे रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून २० हजार रूपये रोख, १५ हजार रूपयांचा एक मोबाईल, सात हजार रूपये किमतीचे सोन्याचे दीड ग्रॅमचे मणीमंगळसूत्र, पाच हजार रूपयांचे चांदीचे १२ भार वजनाचे कडे आणि चार हजार रूपयांची सोन्याची अर्धा ग्रॅमची नथ व चांदीची साखळी असा एकूण ५२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.
या चोरीच्या घटनेसोबतच परिसरात एक अजब प्रकारही समोर आला आहे. अज्ञाताने फिर्यादीच्या शेजारी राहणारे रवी म्हस्के यांच्या पॅन्टीचा भाग कात्रीने कापून नुकसान केले. तसेच गावातील एका लहान मुलीच्या अंगावरील कपडे आणि पांघरलेले घोंगडे देखील कात्रीने कापून नुकसान केले आहे. या विचित्र प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार खरात हे पुढील तपास करत आहेत.
वाघेश्वरी मंदिरात चोरी; सोन्या चांदीचे दागिने लंपास
नगर तालुक्यातील पारगाव भातोडी येथील येथील वाघेश्वरी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केली आहे. मंदिरातील मूर्तीवरील सोन्याचांदीचे दागिने व सीसीटीव्ही चा डीव्हीआर असा सुमारे १ लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत प्रदीप अर्जुन शिंदे (वय ४७, रा. पारगाव भातोडी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी १६ मे रोजी रात्री ९.३० ते १७ मे रोजी पहाटे ५.३० यावेळेत वाघेश्वरी मंदिरात दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करत गाभाऱ्यातील देवी मूर्ती चे चांदीचे दोन मुकुट, चांदीचे त्रिशूल, चांदीचे दोन करांडे तसेच सोन्याचे दागिने, पितळी पादुका असा सुमारे १ लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. या शिवाय चोरट्यांनी मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही चा डिव्हीआर ही घेवून गेले.
१७ मे रोजी सकाळी मंदिर उघडल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. चोरीची माहिती समजताच ग्रामस्थांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Post a Comment