मुंबई - देशावर ' एल निनो 'ची सावट असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने जून महिन्यासाठी आणि संपूर्ण मोसमासाठी नवा अंदाज जाहीर केला आहे. 2026 च्या मान्सूनसाठी हवामान विभागाने दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून यानुसार यंदा सरासरीच्या 90 टक्केच पाऊस होण्याची शक्यता आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात हा आकडा 92 टक्के असेल असा अंदाज होता. पण आता हा आणखी खाली घसरल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे.
आयएमडीने २९ मे रोजी जारी केलेल्या पत्रात जून महिन्यातचं 'एल निनो' सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हळूहळू एल निनोचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीहून 90 टक्के होणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये चार टक्के कमी-जास्त परिणाम दिसू शकतो. यामुळे जून महिन्यात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात उष्णतेच्या तीव्र लाटा राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
जून महिन्यात ईशान्य भारतातील पावसावर अधिक परिणाम दिसणार नसून सामान्य पाऊस होईल. पण मध्य आणि द्विपकल्पीय भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. यामुळे महाराष्ट्रावर मोठा परिणाम होणार आहे. मध्य भारतावर याचा 43 टक्के परिणाम होणार असून द्विपकल्पात 45 टक्के परिणाम दिसून येणार आहे. जून 2026मध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा असतील.
सध्या प्रशांत महासागरात एल निनोची परिस्थिती निर्माण होत आहे. ही प्रणाली भारतात नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात पोहचण्याचा अंदाज आहे. याचा खरिपावर मोठा परिणाम होणार आहे.
खरिप पिकाला फटका बसणार
पश्चिम आशियातील संघर्षामुळे अन्नधान्याच्या किंमती वाढलेल्या आहेत. भारताला महागाईच्या झळा बसत आहेत. कमी पावसामुळे शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येत्या काही आठवड्यात एल निनोची परिस्थिती उद्भवणार असून देशात उष्णताही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी उत्पादनावर दबाव येऊ शकतो. वर्षाच्या उत्तरार्धात धान्य महागण्याची भीती आहे.
यावेळी ईशान्य भारतात सरासरीच्या 94 ते 106 टक्के पाऊस होणार आहे. पण देशातील शेतीवर अवलंबून असलेला भाग, म्हणजे मान्सून कोअर झोनमध्ये सरीसरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद केली जाणार आहे. याशिवाय हिंद महासागरातील द्विध्रुव सध्या तटस्थ आहे. संपूर्ण मान्सून हंगामात हे तटस्थच राहणार असल्यामुळे फरासा परिणाम होणार नाही. हवामान विभाग जुलैमधील पावसाचा अंदाज जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करणार आहे.

Post a Comment