बहुचर्चित शेअर मार्केट फसवणूक प्रकरणाच्या तपासात दिरंगाई, गुंतवणूकदारांच्या संतापाचा उद्रेक



अहिल्यानगर - शेवगाव येथील बहुचर्चित शेअर मार्केट फसवणूक प्रकरणाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी (दि.15 मे) थेट आर्थिक गुन्हे शाखेचे कार्यालय गाठत पोलीस प्रशासनाला जाब विचारला. संशयित आरोपींना अद्याप अटक होत नसल्याने तसेच गुंतवलेली रक्कम परत मिळणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे गुंतवणूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी काही काळ आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

शेवगाव येथील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या फसवणुकीचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात काही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणार्‍या साईनाथ कवडे याच्या इतर साथीदारांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. कवडे याला अटक केली असली तरी त्याच्या संशयित नातेवाईकांनाही अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून करण्यात आला.

फसवणुकीत आपली आयुष्यभराची जमा पुंजी गमावलेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांच्या तपासाच्या गतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. गुन्हे दाखल होऊन इतका कालावधी लोटला, तरी आरोपी मोकाट फिरत आहेत. पोलिसांकडून केवळ आश्‍वासने दिली जात आहेत; मात्र प्रत्यक्षात गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून देण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत, असा आरोप संतप्त गुंतवणूकदारांनी केला.

शुक्रवारी दुपारी अनेक गुंतवणूकदार पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या कॅबिनमध्ये जमा झाले. त्यांनी तपासाची सद्यस्थिती, आरोपींवरील कारवाई आणि गुंतवलेली रक्कम परत मिळवून देण्याबाबत थेट प्रश्‍न उपस्थित करत उगले यांना धारेवर धरले. गुंतवणूकदारांचा वाढता आक्रमक पवित्रा पाहता उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गुंतवणूकदारांनी पोलिसांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली. आरोपींवर कठोर कारवाई करून गुंतवणूकदारांची फसवलेली रक्कम तातडीने परत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकरणामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यपध्दतीवरही प्रश्‍न उपस्थित होत असून, तपासाला गती देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 


0/Post a Comment/Comments