पुणे - पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका संशयित आरोपीला नागपूर रेल्वे जंक्शन येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुणे शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संशयित आरोपीचे नाव शिवाजी राठोड असल्याचे माहिती समोर आली आहे.
ही घटना बुधवारी (13 मे) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हडपसर येथील कामधेनू इस्टेटमधील 'उषाकीरण हॉस्पिटल'मध्ये ही घटना घडली. हॉस्पिटलचे ॲडमीन कॉर्डीनेटर प्रमोद भागवत भालके (वय 28) आणि डॉ. विलास गायकवाड हे पहिल्या मजल्यावर रुग्णांची तपासणी करत असताना, त्यांना अतिदक्षता विभागाजवळील स्वच्छतागृहाचा लाईट सुरू दिसला.
अन् त्यांना बॉम्ब दिसला
लाईट बंद करण्यासाठी गेले असता, डॉ. गायकवाड यांना वॉश बेसिनच्या खाली एक संशयास्पद वस्तू आढळली. पांढऱ्या रंगाच्या चार नळकांड्या वायरच्या साहाय्याने एका इलेक्ट्रीक घड्याळाला जोडलेल्या होत्या आणि त्यातून 'टिक-टिक' असा आवाज येत होता. डॉ. गायकवाड यांनी ती वस्तू उचलून एका रिकाम्या सलाईनच्या बॉक्समध्ये ठेवली. त्यानंतर भालके यांनी तो बॉक्स तातडीने हॉस्पिटलबाहेरील मोकळ्या जागेत नेऊन ठेवला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि एटीएसने घटनास्थळी धाव घेतली. रात्री नऊच्या सुमारास बॉम्ब शोधक पथकाने ही वस्तू ग्लायडींग सेंटर येथे नेऊन सुरक्षितपणे निकामी केली.
याप्रकरणी प्रमोद भालके यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मानवी जीवन धोक्यात आणणे आणि विस्फोटक पदार्थ अधिनियम 1908 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे, एटीएसने शुक्रवारी या प्रकरणातील संशयित आरोपीला नागपूर रेल्वे जंक्शनवरून अटक केली. आरोपीने हे कृत्य नेमक्या कोणत्या उद्देशाने केले, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
आयईडी असल्याचे निष्पन्न
हडपसर परिसरातील रुग्णालयात बुधवारी सायंकाळी सापडलेली संशयास्पद वस्तू ही केवळ बॉम्ब सदृश नसून ती प्रत्यक्षात आयईडी (इम्प्रुव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक यंत्रणाच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयात घातपात घडवण्याचा डाव होता का, याचा तपास आता दहशतवादविरोधी पथक तसेच पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू केला आहे.
हडपसर भागातील कामधेनू इस्टेटच्या मागील बाजूने हे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीला संशयास्पद वस्तू आढळून आली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, वस्तू बॉम्ब सदृश दिसत असतानाही रुग्णालय प्रशासनाने व वरिष्ठ डॉक्टरांनी ती वस्तू पहिल्या मजल्यावरील शौचालयातून बाहेर काढून मोकळ्या मैदानात ठेवली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिल्याचे तपासात समोर आले आहे. या हलगर्जीपणामुळे मोठा अनर्थ घडू शकला असता, अशी चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.

Post a Comment