'नीट' पेपरफुटीप्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन समोर, सीबीआय ने एकाला घेतले ताब्यात

 


अहिल्यानगर - देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट २०२६'च्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १३ मे रोजी सकाळी अहिल्यानगरमधून डॉ. धनंजय निवृत्ती लोखंडे (वय २६) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. लोखंडे यानेच नाशिकच्या खैरनारला प्रश्नपत्रिका पुरविली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. याबाबत सीबीआयने मोठी गुप्तता पाळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आल्यानंतर डॉ. धनंजय लोखंडे हा पुण्यातून फरार झाला होता. पोलीस तपासात त्याचे शेवटचे लोकेशन पुणे येथेच आढळले होते. मात्र, पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच त्याने तिथून पलायन केले आणि तो अहिल्यानगरमध्ये लपून बसला होता. लोखंडे याचे मूळ गाव राहुरी तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येते. तो पुण्यातच राहत होता.

दरम्यान कारवाईच्या भीतीने लोखंडे अहिल्यानगरमध्ये आश्रयाला असल्याची खात्रीशीर माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर सीबीआयचे विशेष तपास पथक आणि स्थानिक पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संयुक्तरीत्या सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

नाशिकमधील शुभम मधुकर खैरनार याला पोलिसांनी अटक केल्यानंतर लोखंडे याचे नाव पुढे आले होते. लोखंडे यांच्याकडून खैरनारला प्रश्नपत्रिका पुरविण्यात आली होती, असेही सांगण्यात येते. त्यामुळे लोखंडे हा या गुन्हयातील मुख्य आरोपी आहे की सूत्रधार अन्य कोणी आहे, याचा तपस करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

कोण आहे हा धनंजय लोखंडे ?

नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून शुभम खैरनारला ताब्यात घेतल्यानंतर तपासादरम्यान धनंजय लोखंडेचे नाव समोर आले. २६ वर्षीय धनंजय निवृत्ती लोखंडे हा राहुरी तालुक्यातील महेगाव (महाडुक सेंटर) येथील रहिवासी आहे. त्याचे वडील शाळेत लिपिक आहेत, तर त्याचा मोठा भाऊ डॉक्टर आहे.

धनंजयने दोन वर्षांपूर्वी कर्नाटकातील मंगळूरू येथून बीएएमएस पूर्ण केले. गेल्या चार वर्षांपासून तो पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात राहत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने तिथेच प्रॅक्टिस सुरू केली. आपल्या वैद्यकीय प्रॅक्टिससोबतच तो मेडिकल ॲडमिशन कन्सल्टंट म्हणूनही काम करत होता. पश्चिम महाराष्ट्रात पसरलेल्या या पेपरफुटीच्या जाळ्याची व्याप्ती किती आहे आणि यात किती डॉक्टर, एजंट किंवा इतर व्यक्ती सामील आहेत, याचा तपास सीबीआय करत आहे.

पुण्यातून एका महिलेलाही घेतले ताब्यात

नीट पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. यात विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचवण्यास हि महिला मदत करत आल्याचा संशय पोलिसांना आहे. तपासात पुणे पोलिसांनी १३ मे रोजी पहाटे मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतले.संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अहिल्यानगरमधून अटक करण्यात ताब्यात घेण्यात आलेल्या धनंजय लोखंडेपर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचे काम मनीषा वाघमारे करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.


 

0/Post a Comment/Comments