पिंपरी-चिंचवड हादरले! आरपीआय कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांची निर्घृण हत्या



पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात बुधवारी (13 मे) रात्री एका भीषण हत्याकांडाने राजकीय वर्तुळ हादरले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. मोशी येथील 'युवराज रेस्टॉरंट अँड बार'मध्ये रात्री ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मोरे हे मोशीतील युवराज रेस्टॉरंटमध्ये असताना रात्री साडे नऊच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मोरे यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या त्यांचा मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, त्याद्वारे मारेकऱ्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून, संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी

अनिल मोरे यांच्या हत्येची बातमी पसरताच पिंपरीतील वायसीएम रुग्णालय परिसरात आरपीआय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या जुन्या वाद किंवा पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा संशय आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण तपासाअंतीच स्पष्ट होईल. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.


 

0/Post a Comment/Comments