लोकनियुक्त सरपंचाविरुध्द अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर



शेवगाव  - सामनगाव (ता. शेवगाव) येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचाविरुध्द सदस्यांनी मांडलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर झाला. ग्रामसभेत राबवण्यात आलेल्या मतदान प्रक्रीयेत अविश्वास ठरावाच्या बाजूने 274 मते, ठरावाच्या विरोधात 26 तर 32 मते बाद झाली. विशेष ग्रामसभेत लोकनियुक्त सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर होण्याची नगर जिल्ह्यातील दुर्मिळ घटना आहे. दरम्यान, सामनगावच्या सरपंच यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास मंजूर झाला आहे.

सामनगाव (ता. शेवगाव) येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आदिनाथ कापरे व उपसरपंच प्रमोद कांबळे यांच्या विरोधात आठ सदस्यांनी कामकाज करतांना विश्वासात घेत नसल्याचे कारण दाखवून 22 एप्रिल रोजी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर प्रशासनाने 30 एप्रिल रोजी ग्रामंपचायत कार्यालयात आयोजीत केलेल्या बैठकीमध्ये आठ सदस्यांनी ठरावाच्या बाजुने मतदान केले. मात्र, सरपंचाची निवड थेट जनतेतून झालेली असल्याने विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मतदानाव्दारे अविश्वास ठरावाची प्रक्रीया गुरुवार दि. 14 रोजी सामनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडली. त्यामध्ये प्रभाग निहाय मतदान प्रक्रीया राबवण्यात आली.

सकाळी 8.30 ते 11 यावेळी मतदानासाठी 370 ग्रामस्थांनी नाव नोंदणी केली. तर 11 ते 4 या वेळेत प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. त्यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 274 मते, ठरावाच्या विरोधात 26 तर 32 मते बाद झाली. तर नावनोंदणी केलेल्या 30 ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवली. या प्रक्रीयेदरम्यान तहसीलदार आकाश दहाडदे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, विस्तार अधिकारी सचिन भाकरे भातकुडगाव, एरंडगाव, मुंगी, शेवगाव, चापडगाव येथील मंडलाधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


 

0/Post a Comment/Comments