अहिल्यानगर - श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील वडारवाडा भागात पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला नगर एमआयडीसी पोलिसांनी साईबन परिसरात अत्यंत शिताफीने अटक केली आहे. विशाल प्रदीप तोरणे (वय ४०, रा. तोरणेवाडी, पढेगाव, ता. श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशिकांत जगन्नाथ बनकर (रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात २९ जून रोजी पहाटे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, २७ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वडारवाडा परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून आरोपी विशाल तोरणे याने फिर्यादीचा पुतण्या सचिन सुभाष बनकर (वय ४०, रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर) याच्याशी वाद घातला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपीने सचिन याच्या पोटात, पाठीत आणि तोंडावर लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीमुळे सचिनच्या पोटात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१), ११५(२), आणि ११७ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. दरम्यान, हा आरोपी नगर एमआयडीसी परिसरातील साईबन भागात आल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने साईबन परिसरात सापळा रचून आरोपी विशाल तोरणे याला शिताफीने ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला पकडून पुढील तपासासाठी श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई सपोनि हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. राकेश खेडकर, पो.हे.कॉ. शैलेश रोहोकले, राजू सुद्रीक, पो.काँ. दीपक फुंदे, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, राहुल गुंडू आणि अरुण सांगळे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment