अहिल्यानगर - फेसबुकवरील बनावट जाहिरातीच्या माध्यमातून स्टेट बैंक ऑफ इंडियाचे 'योनो अॅप' सुरू करून देण्याचे आमिष दाखवत एका निवृत्त महिलेची २१ हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द १२ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दूधसागर सोसायटी, केडगाव येथे राहणाऱ्या ६९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी ७ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सावेडी परिसरातील नोबेल हॉस्पिटलसमोर असताना त्यांच्या मोबाईलवरील फेसबुक अॅपमध्ये योनो अॅप सुरू करून देतो अशी जाहिरात दिसली.
संबंधित जाहिरात डाउनलोड केल्यानंतर एका खात्याशी संबंधित व्यक्तीने त्यांना फोन करून स्वतःला बँकेशी संबंधित असल्याचे भासवले. आरोपीने योनो अॅप सुरू करून देण्याच्या बहाण्याने फिर्यादींकडून व्हॉट्सअॅपव्दारे बैंक खात्यांची तसेच इतर महत्त्वाची माहिती मिळवली. त्यानंतर फिर्यादी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक मुख्य शाखेतील खाते तसेच सावेडी शाखेतील खाते मधून त्यांच्या संमतीशिवाय एकूण २१ हजार रूपये काढून घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, आपल्या खात्यातून रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने १२ जून रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार अनिता मरभळ करीत आहेत.

Post a Comment