नगर पुणे महामार्गावर केडगाव बायपासजवळ भीषण अपघात; ढंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू


अहिल्यानगर - नगर पुणे महामार्गावर केडगाव बायपास चौकाजवळ असलेल्या नील हॉटेलसमोरील स्पीड ब्रेकरवर एका भरधाव ढंपरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या कांचन उर्फ अरमीना अरबाज चौगुले (रा. बालाजी कॉलनी, शाहूनगर, केडगाव) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ढंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अरबाज समीउल्ला चौगुले (वय २६, रा. बालाजी कॉलनी, शाहूनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी  हे २९ जून रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी कांचन उर्फ अरमीना यांच्यासह आपल्या मोटारसायकल (क्र.एमएच १६ डीएल ३२११) वरून नगर पुणे महामार्गाने जात होते. नील हॉटेलसमोरील स्पीड ब्रेकर आल्यामुळे त्यांनी आपल्या वाहनाचा वेग कमी केला. याच वेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या ढंपर (क्र.एमएच १७ सीव्ही २४०२) वरील चालकाने आपल्या ताब्यातील ढंपर अत्यंत बेदरकारपणे चालवून चौगुले यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या भीषण धडकेत कांचन उर्फ अरमीना गंभीर जखमी झाल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर रात्री अरबाज चौगुले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी ढंपर चालक शिवाजी लक्ष्मण कोठे (रा. कोल्हार, ता. राहाता) याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(), २८१ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४()() आणि १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे


 

0/Post a Comment/Comments