अहिल्यानगर - पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल करत अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्यासह श्रीरामपूर शहर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, अहिल्यानगर शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प, एमआयडीसी तसेच श्रीगोंदा, घारगाव आदी पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही अधिकार्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली असून काहींची मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये अधीक्षक सुदर्शन यांनी धक्कातंत्र वापरल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष मर्जीतील मानले जाणारे किरण कबाडी यांना एलसीबीचे प्रभारी करण्यात आले होते. मात्र अवघ्या 11 महिन्यांत त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली शिर्डी येथील साई मंदिर सुरक्षा विभागात करण्यात आली आहे. दरम्यान, एलसीबीला अद्याप पूर्णवेळ प्रभारी देण्यात आलेला नसून सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांची मुदतपूर्व बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून त्यांच्याकडे पोलीस उपअधीक्षक (गृह) पदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. त्यांच्या जागी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी बालाजी वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची राहुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची बदली श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी करण्यात आली आहे. श्रीगोंद्याचे प्रभारी किरण शिंदे यांची बदली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (एएचटीयू) प्रभारीपदी करण्यात आली आहे.
पाथर्डीचे प्रभारी विलास पुजारी यांची बदली मानव संसाधन विभागात करण्यात आली असून मानव संसाधन विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची नियुक्ती पाथर्डी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी संभाजी गायकवाड यांची बदली दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रभारीपदी करण्यात आली असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी नितीन देशमुख यांच्याकडे कोतवाली पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला अद्याप पूर्णवेळ प्रभारी देण्यात आलेला नसून सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. नेवासा पोलीस ठाण्याचा कार्यभार यापूर्वी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात होता. आता नेवासा पोलीस ठाण्यास पूर्णवेळ प्रभारी मिळाला असून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे.
शहर वाहतूक शाखेचे प्रभारी बाबासाहेब बोरसे यांची बदली घारगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची बदली करण्यात आली आहे. घारगावचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी करण्यात आली आहे. एमआयडीसीचे प्रभारी माणिक चौधरी आणि भिंगार कॅम्पचे प्रभारी जगदीश मुलगीर यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याची धुरा कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच राहाता पोलीस ठाण्याचा पदभार दीपक सरोदे, कर्जत पोलीस ठाण्याची जबाबदारी हनुमान गायकवाड यांच्याकडे देण्यात आली असून लोणी पोलीस ठाण्याचे प्रभारीपद सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्याकडे ठेवण्यात आले आहे.

Post a Comment